Aurangabad Crime News: औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील पोखरी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीनशे रुपयांच्या उसनवारीवरून झालेल्या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. डोक्यात कुऱ्हाड मारल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. अरबाज शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात अली आहे. 


याबाबत अधिक माहिती आधी की, पोखरी येथील आकाश मुळे याच्याकडून अजय घाडगे याने तीनशे रुपये उसने घेतले होते. बरेच दिवस झाल्याने आकाश हा अजयकडे पैसे मागण्यासाठी गेला होता.पण पैसे मागण्यासाठी आलेल्या आकाशसोबत अजयचा त्याचा वाद झाला. त्यांनतर काही वेळाने अजयने आकाशाला फोन केला. पोखरी येथे ये आणि माझ्याकडे बाकी असलेले पैसे घेऊन जा म्हणाला. पैसे परत मिळणार आहे असे समजून आकाश पाखरीत आपल्या सहकाऱ्यांसह पैसे आणण्यासाठी गेला. पण तिथे परिस्थिती वेगळीच होती.


मध्यस्थी करणे पडले महागात... 


आकाशला फोनवरून पैसे देण्यासाठी बोलवणारा अजय आपल्यासोबत काही महिला आणि पुरुषांना हातात काठ्या,कुऱ्हाडी घेऊन उभे होते. आकाश येताच अजयने पुन्हा वाद घालायला सुरवात केली. त्यांनतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद अधिकच पेटत असल्याने तिथे उभा असलेला अरबाज शेख हा तरुण भांडण सोडण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा अजय घाडगे याच्या गटातील लोकांनी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या अरबाजच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे आयसीयू उपलब्ध नसल्याने शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय राजेश घाडगे, राजेश साहेबराव घाडगे, अरुण राजेश घाडगे, अरुणा विकास इंगळेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.