Aurangabad  Corona Update: चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत असल्याने,  भारतात (India) देखील खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान राज्यासह सर्वच जिल्ह्यात आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झालं आहे. असे असतानाच औरंगाबादच्या (Aurangabad) हर्सूल कारागृहात एका कैदीचा कोरोना रिपोर्ट (Corona Report) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) अलर्ट झाली असून, संशयीत रुग्णांची (Suspicious Patients) तपासणी केली जाणार आहे. 


बीड येथून शहरातील हर्सूल कारागृहात दाखल झालेला कैदीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट झाली आहे. परदेशातून येणाऱ्यांची, संशयितांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या काही रुग्णांचे जीनोम सिक्वेंसिंग केले जाणार आहे. तसेच संशयीत रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.  तर गेली काही दिवस औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या शून्य असताना, हर्सूल कारागृहातील कैदी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सक्रिय रुग्णाची नोंद झाली आहे.


आरोग्य अधिकारी म्हणतात... 


कोरोनाबाबत बोलतांना औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून, सद्या घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.  तर मधल्या काळात रुग्ण नव्हते, तरीही आवश्यक त्या खबरदारी घेणे सुरू होते. आताही संशयितांची तपासणी केली जात आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी, रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था आदींचे नियोजन केले जाईल, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले आहे. 


 ग्रामीण भागात सध्या सक्रिय रुग्ण नाही


तर सद्या औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या सक्रिय रुग्ण नाही. मात्र तरीही नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. तसेच लस घेऊनही पॉझिटिव्ह येणे, 2 ते 3  वेळा पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे जीनोम सिक्चेंसिंग केले जाणार आहे. त्याचप्रमाणे थर्मल स्क्रीनिंग, लसीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे. 


चीनमध्ये BF.7 व्हेरियंटचा थैमान...


चीनमध्ये थैमान घालणारा BF.7 हा Omicron च्या BA.5 व्हेरियंटचा सब-व्हेरियंट असल्याचं समोर आले आहे. या व्हेरियंटचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता असून, याचा इनक्यूबेशन कालावधीही कमी आहे. धोकादायक गोष्ट म्हणजे, ज्यांना कोरोनाची लस घेतली आहे अशा लोकांना देखील या व्हेरियंटची लागण होऊ शकते. 


COVID-19 BF.7 Omicron Variant: भारतात ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BF.7 ची एन्ट्री; कितपत धोकादायक अन् लक्षणं काय?