Aurangabad News: भाजप नेते पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यांनतर यावर आता कराडांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं कार्यालय फोडायला येणार आहेत हे सांगून देखील पोलिसांनी त्या व्यक्तीला  अगोदर ताब्यात घेतले नाही. त्यामुळे कालच्या हल्ल्यात पोलिसांचे दुर्लक्ष झालं असल्याचा थेट आरोप कराड यांनी केला आहे. 


यावेळी बोलताना कराड म्हणाले की, मी काल गोव्यामध्ये असताना सचिन डोईफोडे नावाचा तरुण माझ्या कार्यालयावर हल्ला करणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यांनतर मी तात्काळ दराडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्यांनतर विमानतळावर उतरल्यावर कार्यालयासमोर काही तरी हाणामारी झाली असल्याच मला कळालचं कराड म्हणाले. 


पोलिसांचे दुर्लक्ष...


पोलिसांना सांगून सुद्धा काही लोकं कार्यालयावर येतात, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे पोलिसांचे दुर्लक्ष म्हणावे लागेल. त्याच कार्यकर्त्याने तीन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला केला होता आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता. आता सुद्धा माझं कार्यालय फोडायला येत असल्याचं सांगतोय तरीही पोलीस लक्ष घालत नाही. पोलीस असं का करत आहेत याचं मला संशय येत असल्याच कराड म्हणाले. एक-दोन वेळा सांगून सुद्धा त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. त्यामुळे रात्री पोलीस आयुक्त यांना बोललो असून, आजही बोलणार असल्याच कराड म्हणाले.


भाजपचा कार्यकर्ता नाही...


माझ्या कार्यालवर हल्ला करण्यासाठी आलेला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, तसेच पंकजा मुंडे यांचा सुद्धा समर्थक नाही. तो बाळासाहेब सानप यांच्या भगवान महासंघाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे सानप यांना सुद्धा मी बोललो असून, आज त्याची हकालपट्टी करणार असल्याच सानप मला म्हणाल्याचं कराड म्हंटले आहे. 


पोलिसात गुन्हा दाखल...


भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ ते दहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या दोन जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्लेखोरांना मारहाण करणाऱ्या अनोळखी आठ ते दहा लोकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.