Aurangabad Lightning Strike: औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान फुलंब्री तालुक्यातील साताळा येथे शेतात काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर कन्नड तालुक्यातील नागद येथे एका झाडाखाली उभा असलेल्या महिलांच्या अंगावर वीज पडल्याने सात महिला आणि एक पुरुष जखमी झाला आहे.
दोघांचा मृत्यू...
फुलंब्री तालुक्यातील आळंद येथून जवळच असलेल्या साताळा येथे रविवारी शेतात काम करत असलेल्या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. रवी जनार्दन कळसकर (वय 22), रोहन विजय शिंदे (वय 15, दोघेही रा. साताळा ता. फुलंब्री) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.रविवारी दुपारी एकच्या सुमारास रवी आणि रोहन दोघेही शेतात शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु असल्याने दोघे झाडाखाली थांबले. दरम्यान अचानक या दोघांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
महिलांच्या अंगावर वीज कोसळली...
दुसरी घटना कन्नड तालुक्यातील नागद जवळील बेलखेडा तांडा येथे घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास बेलखेडा तांडा येथील गट क्रमांक 23 मध्ये दादाभाऊ सलतान पवार यांच्या शेतात शेतमजूर महिला कापूस निदनी करत होत्या. यावेळी अचानक विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतातील शेतकरी व शेतमजूर जवळील लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबले. दरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज झाडाला स्पर्श करून जमीनीवर पडली. या घटनेमध्ये झाडा खाली बसलेल्या सहा महीला मजूर व एक शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बेलखेडा तांडा तसेच बेलखेडा गावातील ग्रामस्थांनी जखमींना चाळीसगाव (जि. जळगाव) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेत विमलबाई भगवान राठोड, गीताबाई गणेश राठोड, कविता अनिल राठोड या महिलांची तब्येत गंभीर आहे. तर सरलाबाई सुनील राठोड, सरलाबाई युवराज चव्हाण, शालिनी प्रवीण पवार या महिलासह राजेंद्र गबा पवार हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.