Aurangabad News: शिवसेना कुणाची यावर अजूनही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. मात्र आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा सतत शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता मुंबईत शिंदे गटाकडून दादर येथे प्रती शिवसेना भवन तयार केले जाणार असल्याचे समोर येत आहे. तर त्या पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये सुद्धा शिंदे गटाकडून शिवसेना भवन उभं केले जाणार आहे.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहित दिली असून, मुंबई पाठोपाठ औरंगाबादेतही शिंदे गट शिवसेना भवन बनवणार असल्याचं जंजाळ म्हणाले आहेत. औरंगाबाद शहरातील महत्वाच्या ठिकाणी जागेचा शोध सुरू असल्याचं जंजाळ म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद शहरात शिंदे गटाचे भव्य शिवसेना भवन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद दोन्ही सेनेचं केंद्रबिंदू...
औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचं बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून औरंगाबाद आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी धडपड सुरु आहे. त्यातच शिंदे गटात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील गेले असून, दोन मंत्रीपद शिंदे गटाकडून औरंगाबादकला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात औरंगाबाद मात्र केंद्रबिंदू बनला आहे. त्यामुळेच औरंगाबादला सुद्धा प्रती शिवसेना भवन बनवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात आहे.
शिंदे सेनेच्या शाखाही सुरु करणार...
मुंबईप्रमाणेही मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे आम्ही शिवसेना भवन उभारणार आहोत. त्यासाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत. याशिवाय शिंदे सेनेच्या शाखा ही तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्याची तयारी शिंदे सेनेकडून सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
खैरेंकडून उत्तर...
शिंदे गटाकडून प्रती शिवसेना भवन उभं करण्याचा निर्णय मुंबईतील शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. यासाठी शिवसैनिक मार खातील, गुन्हे दाखल करून घेतील, जेलमध्ये जातील पण शिवसेना भवनाची विटंबना होऊ देणार नसल्याचं शिवसेनेचे नेते चंदकांत खैरे म्हणाले आहे. बंडखोरी करणाऱ्यांना भक्कम असा खोक्याने पैसे मिळाले आहेत. त्यामुळे प्रती शिवसेना उभं करण्याचं त्यांना वेढ लागले असल्याची टीका खैरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: बंडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीत खैरेंच होमहवन, कामाख्या देवीला अभिषेकही घातला
Aurangabad: कॅबिनेटसोबतच पालकमंत्रीपदही हवं; शिरसाटांच्या भूमिकेने 'भुमरे समर्थक' गोंधळात