Maharashtra Politics: निवडणुक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यावर, शिवसेनेच्या सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यातच आज सकाळी विधिमंडळातील शिवसेना कार्यालयाचा देखील शिंदे गटाने ताबा घेतला आहे. दरम्यान, आता औरंगाबादमधील (Aurangabad) औरंगपुरा भागात उभारलेले शिवसेना भवनदेखील (Shiv Sena Bhavan) आमचेच असून, आगामी काळात ते ताब्यात घेणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) आणि शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी केला आहे. याबाबत दिव्य मराठीने वृत्त दिले आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचं म्हणत निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर आता शिवसेनेचे शाखा कार्यालय, वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिवसेना भवनावर देखील शिंदे गटाकडून दावे केले जात आहे. दरम्यान, औरंगाबादच्या औरंगपुरा भागात उभारलेले शिवसेना भवनदेखील शिंदे गटाकडून ताब्यात घेण्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना आमदार शिरसाट म्हणाले की, ही जागा मनपाची असून ठाकरे गटाने ‘लीज’वर घेतली आहे. त्यांनी जागेचे भाडेदेखील वेळेवर भरलेले नाही. त्यामुळे आगामी काळात ही जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. शहरातील मोक्याची जागा त्यांच्या नाकर्तेपणामुळे वाया जात असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर...
दरम्यान, शिरसाट यांनी औरंगाबादच्या औरंगपुरा भागात उभारलेले शिवसेना भवनावर दावा केल्याने, ठाकरे गटाकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना काही समजत नसून, या जागेसाठी आणि ईमारत उभी करण्यासाठी मी पुढाकार घेतला असल्याचं माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. तर, 'ही जागा शिवाई सेवा ट्रस्टची असून, ताबा घेण्याचा शिंदे गटाचा प्रश्नच येत नाही. यामध्ये सुभाष देसाई, लीलाधर डाके हे जुने नेते ट्रस्टी असल्याचं' विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहे.
वाद पेटण्याची शक्यता
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर सर्वाधिक पडसाद औरंगाबाद जिल्ह्यात उमटले होते. तर याच औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. तर मंत्रिमंडळ विस्तारत देखील औरंगाबादमधील शिंदे गटाच्या दोन आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाली. आता त्याच औरंगाबादमधील शिवसेना भवनावर दोन्ही गटाने दावा केल्याने, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर भविष्यात हा मुद्दा देखील न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Shiv Sena Party Office : विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला