औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला. गेली 20 वर्षे चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार होते, मात्र खासदार असताना सुद्धा औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ कधीही शिवसेनेला मिळाला नाही. या मतदारसंघावर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र 2014 च्या निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री झाली आणि मंत्री राजेंद्र दर्डा यांचे डिपॉझिट जप्त झालं.
पहिल्याच निवडणुकीत एमआयएम दुसऱ्या स्थानी राहीलं. एमआयएमने 2014 च्या निवडणुकीत डॉ. गफार कादरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. अवघ्या काही मताने इथं भाजपाचे अतुल सावे विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे विद्यमान चंद्रकांत खैरे यांच्यावर तब्बल 36 हजार 930 मतांची आघाडी घेतली. जलील यांना मिळालेले हे मताधिक्य पाहात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात 'कमळ' पुन्हा फुलविण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर मते मिळवण्यात यश आलं. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा जलील यांना अधिक मते मिळाली. जलील यांना 92 हजार 347 मते मिळाली. खैरे यांना केवळ 55 हजार 417, जाधव यांना 25 हजार 619 आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 14 हजार 96 मते मिळाली. इतर उमेदवारांना मिळून 3 हजार 987 मते मिळाली आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एकूण 1 लाख 92 हजार 233 मतदान झाले.
जलील यांना मिळालेले मताधिक्य पाहात औरंगाबाद पूर्व मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागेल, असे दिसते आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कसे होते चित्र
भाजपचे अतुल सावे यांनी 64 हजार 528 मते मिळाली त्यांनी एआयएमआयएमचे अब्दुल गफार कादरी यांचा 4 हजार 260 मतांनी पराभव करत विजय खेचून आणला. एमआयएमच्या गफार कादरी याना 60 हजार 278 मते मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार माजी महापौर कला ओझा यांना 11 हजार 409 मतं मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन आमदार राजेंद्र दर्डा यांना 21 हजार 203 मते मिळाली होती.
लोकसभेत एकत्र लढूनही युतीची पिछेहाट
गेली विधानसभा निवडणूक शिवसेना, भारतीय जनता पक्षाने वेगवेगळी लढली होती. या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती झालेली असतानाही एआयएमआयएमचे इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून तब्बल 36 हजार 930 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत येथू 'कमळ' फुलविण्यासाठी भाजपला मोठी मशागत करावी लागेल, असं दिसते.
उमेदवारांची मते
इम्तियाज जलील 92 हजार 347
चंद्रकांत खैरे 55 हजार 417
हर्षवर्धन जाधव 25 हजार 619
सुभाष झांबड 14 हजार 096
विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत्र लढणार आहेत. एमआयएम हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवेल. एमआयएमकडून या विधानसभा मतदारसंघातून गत निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले डॉ. गफार कादरी हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. काँग्रेसकडून 2014 च्या निवडणुकीत माजी मंत्री राजेंद्र दर्डा हे उभा होते, मात्र यावेळी ते इच्छुक नाहीत. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघातून उमेदवार शोधूनच उभा करावा लागेल.
शिवसेना-भाजप एकत्र लढतील अशी सध्या तरी अपेक्षा आहे. मात्र जर यदाकदाचित शिवसेना-भाजपाची युती फिस्कटली तर मात्र भाजपाच्या हातून हा मतदारसंघ जवळपास नसल्यासारखाच असेल. एमआयएमला या मतदारसंघातून विजयाची खात्री अधिकाय आहे, त्याचं कारण 2014 च्या निवडणुकीमध्ये हे केवळ मुस्लिमांची मते एमआयएमच्या उमेदवाराला मिळाली होती. आता लोकसभा मतदार संघातही या मतदारसंघातून दलित समाजाची मते एमआयएमला मिळाली होती आणि तीच मतं विधानसभेतही कायम राहतील, असा विश्वास एमआयएमला आहे. भाजपा देखील मुस्लिम आणि दलित समाजाची मतं कशी फुटतील आणि त्यामुळे आपला कसा फायदा होईल, अशी रणनीती आखते आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपा विरुद्ध एमआयएम अशीच लढत पाहायला मिळेल हे मात्र निश्चित आहे.