औरंगाबाद : आम्ही काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली होती आणि आम्ही जोपर्यंत 288 जागा जाहीर करत नाहीत तोपर्यंत ही ऑफर कायम आहे असं समजावे आणि त्यांनी निर्णय घ्यावा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. काँग्रेस आम्हाला लोकसभेत बी टीम आणि विधानसभेत सोबत या असं म्हणतेय. हे नक्की काय आहे याचा खुलासाही काँग्रेसने करावा असेही आंबेडकर म्हणाले. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती.


यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकमेकांना स्वीकारत नाही म्हणून वंचितांची सत्ता येत नाही. मात्र आता आपल्याला बदलायचं आहे. लहान-मोठे सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची आहे, असे आंबेडकर म्हणाले. वंचितांचे प्रश्न सत्तेवर बसल्याशिवाय सुटणार नाहीत म्हणून आपण सत्तेत यायला हवे असे आंबेडकर म्हणाले.


कारगिलमध्ये घुसखोरी झाल्याचं तिथल्या गडरिया समाजाने पुढं आणलं.  गडरिया म्हणजे तिथले धनगर. त्यांनी मला प्रश्न विचारला की आपल्याच भूमीतून आपण अतिक्रमण करणाऱ्यांना हुसकावून लावले मग हा कसला विजय दिवस.  उलट बर्फ पडल्यावर जे सैनिक चौकी सोडून आले त्यांच्यावर कारवाई का नाही? असं प्रश्न त्यांनी विचारला. सध्या राष्ट्रभक्ती देखावा झाला असल्याचं आंबेडकर म्हणाले.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले कर, लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही भाजपची 'बी टीम' असतो आणि विधानसभेत आम्हाला सोबत या म्हणता. त्यामुळे आम्ही भाजपची बी टीम होतो का याचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पक्षात फुट पडत आहे. आम्ही त्यांना 40 जागांची ऑफर दिली होती. आम्ही जोपर्यंत वंचितचे 288 जागांवर उमेदवार जाहिर करत नाही, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने ही ऑफर कायम असल्याचे समजावे आणि निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.


मी विजयी झालो तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळेच : खासदार इम्तियाज जलील
यावेळी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आज देशात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या मोदींमुळेच, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जातोय. पण त्यात तथ्य नाही, खरी परिस्थिती काय आहे, हे आम्ही दाखवत राहू आणि सरकारला जाब विचारतच राहू. लोकसभा निवडणुकीत मी विजयी झालो तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळेच, असे ते म्हणाले.


ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळे गुंतलेलो होतो, पण आता मोकळे आहोत. तुम्ही फक्त सांगा कुठून निवडणूक लढवायची, लोकसभा तो झाँकी थी, विधानसभा की पिक्‍चर अभी बाकी है.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर विजयी होतील आणि आमच्या सोबत संसदेत असतील याची खात्री होती, पण तसे घडले नाही. एका पराभवाने खचून जायचे नाही. बाळासाहेब राज्यात धमाका करतील आणि आम्ही संसदेत करू.


आता एवढ्यावरच थांबायचे नाही, आगामी विधानसभेत सर्व रंगांचे झेंडे तिथे पोहोचले पाहिजेत. बंजारा समाजाने आतापर्यंत फक्त मतदान केले, पण आता संकल्प करा, जो आम्हाला न्याय देईल त्यालाच मत देणार, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी उपस्थितांना केले.