Chandrakant Khaire: नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. तर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते देखील एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि ठाकरे गटावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार बांगर मटका चालवून रोज एका लाखांचा हप्ता जमा करत असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे आरोप केले आहेत. 


यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, मटका चालवून आमदार बांगर रोज एक लाख रुपये कमवतात. मला याबाबत सर्व माहिती आहे. बांगर मटके आणि इतर लफडे करून त्यातून हप्ते वसूल करतात.त्यांचे संपूर्ण चरित्र मला माहित आहे. तर हे सर्व काही वाचावे म्हणून बांगर शिंदे गटात गेले असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे. तर ज्यांची लफडी आहे अशाच लोकांना शिंदे आपल्याकडे धमकी देऊन ओढत असल्याचा आरोप देखील खैरे यांनी यावेळी केला. 


बांगर यांना सरळ करू....


यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, आम्ही मराठवाड्यात शिवसेना टिकवली म्हणून तुम्ही मोठे झालात. आज शिंदे यांच्या जीवावर बांगर शिवसेनेवर बोलत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री लवकरच जाणार आहे. त्याची सुरवात आजपासून झाली आहे. संजय राऊत यांच्याकडे बांगर अनकेदा पाया पडण्यासाठी जात होते. त्यामुळे आता त्यांना आम्ही सरळ करून टाकू असा इशारा खैरे यांनी यावेळी दिला. 


राहुल शेवाळेंवर टीका...


आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर देखील खैरे यांनी निशाणा साधला आहे. राहुल शेवाळे यांचे किती लफडे आहेत हे मला माहित असल्याचं खैरे म्हणाले. तर  उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांना तीन-चार वेळा स्थायी समितीवर संधी दिली. त्यातून त्यांनी किती कमवले. राहुल शेवाळे कोण होते. त्यांच्या पत्नी मदतीसाठी माझ्यासमोर मातोश्रीवर रडत आल्या होत्या. त्यामुळे शेवाळे यांनी आधी स्वतःच चरित्र पाहावे आणि त्यानंतर दुसऱ्यावर बोलावे असेही खैरे म्हणाले. 


Video: शिंदे अन् ठाकरे गटाचे खासदार संसदेतील कार्यालयात एकत्र! व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती