औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपासून चर्चेत होतं. अशातच या चर्चांना पूर्णविराम देत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानातील एकही झाड तोडू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी 'abplive.com' ने औरंगाबादमधील 17 एकरवर स्थित असलेल्या प्रियदर्शिनी उद्यान परिसरातील होत असलेल्या झाडांच्या कत्तलीसंदर्भात वृत्त प्रकाशित केलं होतं. याची दखल घेत आता थेट मुख्यमंत्र्यांनी ही वृक्षतोड थांबवण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी प्रियदर्शिनी उद्यान परिसरातील कोणतीही झाडं कापली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाचे पालन करणार असल्याचे महापौरांकडून सांगण्यात आले आहे. एबीपी माझाने दिलेल्या बातमीमुळे प्रियदर्शनी उद्यानातील तब्बल 444 झाडं वाचणार आहेत.

औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे पर्यावरणप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. या उद्यानात लोकांना तासनतास फिरावसं वाटतं. शहरातील सर्वात शुद्ध हवा इथे आहे. शहरातील लोक या उद्यानाला ऑक्सिजन हब म्हणतात. 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरं, सरपटणारे जीव आणि आकाशाला स्पर्श करु इच्छिणारी उंचच उंच झाडं या उद्यानात आहेत. परंतु जे आज दिसतंय ते या उद्यानाचं निम्मं राहिलेलं वैभव आहे. या उद्यानाची जागा सिडकोकडून मनपाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडं प्रस्तावीत आहेत.

'शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार, गेट वेल सून' अमृता फडणवीस यांची टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार असल्याचं वृत्त येताच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. प्रियदर्शनी मैदानात होणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल होणार, असं समजताच अमृता फडणवीसांनी शिवसेनेला ढोंगी म्हणत, दलालीचा आरोप केला होता. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


अमृता फडणवीस यांच्या टिकेला प्रियंका चतुर्वेदींचं प्रत्युत्तर

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनीही अमृता फडणवीस यांच्या ट्वीटरला प्रत्युत्तर दिल आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणतीही वृक्षतोड होणार नसल्याचं प्रियंका चतुर्वेदींनी स्पष्ट केल आहे. तसेच प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, "मॅडम, तुम्ही हे ऐकल्यावर कदाचित तुमची थोडी निराशा होईल पण मी तुम्हाला सांगते की, स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल होणार नाही. औरंगाबादच्या महापौरांनीही हे स्पष्ट केलं आहे. झाडांच्या कत्तलीसाठी दलाली घेणं, हे भाजपचं नवं धोरण आहे का?"

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला अखेर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नाही, असेही ते म्हणाले होते. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. पूर्ण कामाची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर आरेचा न्याय प्रियदर्शनी उद्यानाला मिळेल का? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती

प्रकल्पाचा एकूण खर्च - 64 कोटी
उद्यानाचा परिसर - 17 एकर
पुतळ्यासाठी जागा - 1 हजार 135 चौरस मीटर
फुड पार्कसाठी जागा - 2 हजार 330 चौरस मीटर
म्युझियमसाठी जागा - 2 हजार 600 चौरस मीटर
ओपन एअर स्पेस - 3 हजार 690 चौरस मीटर

संबंधित बातम्या : 

'शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार, गेट वेल सून' अमृता फडणवीस यांची टीका