औरंगाबाद : आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडला स्थगिती देणाऱ्या शिवसेनेचा दुटप्पीपणा औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान उघड करत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेने या परिसरातील झाडं जाळली जात असताना, कापली जात असताना मौन बाळगलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परिसरातील झाडं आणि जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळे आरेचा न्याय प्रियदर्शनी उद्यानाला मिळेल का? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.


औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे पर्यावरणप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. या उद्यानात लोकांना तासनतास फिरावसं वाटतं. शहरातील सर्वात शुद्ध हवा इथे आहे. शहरातील लोक या उद्यानाला ऑक्सिजन हब म्हणतात. 70 हून जास्त प्रजातींचे पक्षी, 40 प्रकारची फुलपाखरं, सरपटणारे जीव आणि आकाशाला स्पर्श करु इच्छिणारी उंचच उंच झाडं या उद्यानात आहेत. परंतु जे आज दिसतंय ते या उद्यानाचं निम्मं राहिलेलं वैभव आहे. या उद्यानाची जागा सिडकोकडून मनपाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडं प्रस्तावीत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती
प्रकल्पाचा एकूण खर्च - 64 कोटी
उद्यानाचा परिसर - 17 एकर
पुतळ्यासाठी जागा - 1 हजार 135 चौरस मीटर
फुड पार्कसाठी जागा - 2 हजार 330 चौरस मीटर
म्युझियमसाठी जागा - 2 हजार 600 चौरस मीटर
ओपन एअर स्पेस - 3 हजार 690 चौरस मीटर

प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. 6 वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली.

दरम्यान, याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मनपाने दुष्काळाचे कारण देत झाडं कमी झाल्याचे स्वतःच मान्य केले. पण याच कथित पाणी टंचाईच्या तीन वर्षांच्या काळात उद्यान विभागाने शहरात 66 हजार 69 झाडं लावली कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.

उद्यानातील झाडं कमी होण्याचे टप्पे (उद्यानात सुरुवातीला एकूण 10 हजारहून अधिक झाडं होती)
12 जानेवारी 2016 - उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद
30 नोव्हेंबर 2019 - उद्यानात 8 हजार 970 झाडांची नोंद
कमी झालेल्या झाडांची संख्या - 1 हजार 225 झाडे
गेल्या तीन वर्षात उद्यान विभागाने लावलेली झाडे - 0

स्थानिक लोकांनी, पर्यावरण प्रेमींनी भर उन्हाळ्यात स्वतः पाणी घालून झाडं वाचवली, पावसाळ्यात लहान-मोठे बांधारे बांधले, स्वच्छता केली तरिही पालिकेला पाझर फुटला नाहीच. याऊलट पालिकेने हे उद्यान दारुडे, गर्दुल्ले, नशेखोरांच्या हवाली केलं आहे. लोकांनी वर्गणी काढून दुरुस्त केलेले उद्यानाचे कुंपण गर्दुल्ल्यांनी तोडलं आहे.