Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad News) वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबारकरण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गोळीबार करणारे आरोपी वाहन सोडून फरार झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर हिवाळी कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला दरवर्षी दुकाने लागतात. दरम्यान मंगळवारी रात्री 11: 35 वाजेच्या सुमारास या व्यापाऱ्यांना धमकावत एकाने गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने गोळीबार केला. ही घटना वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ घडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.याबाबत माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गोळीबार करणारा व्यक्ती फरार झाला होता.
पोलिसांकडून शोध सुरू
वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी ज्या वाहनातून आले होते ते वाहन जागीच सोडून पळून गेले. तर त्यांचे हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही आणि वाहनांच्या नाेंदणीवरून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पाच संशयित ताब्यात...
वाळूज परिसरातील उबदार कपडे विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दिशेने हवेत गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशेने रवाना केली होती. या पोलीस पथकांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आणले असून, पुढील तपास प्रक्रिया एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.
पोलिसांचा धाक उरला नाही...
गेल्या काही दिवसातील औरंगाबाद शहरातील गुन्हेगारी घटना पाहिल्या असता शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात नशेखोरी वाढली आहे, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत, 2022 वर्षे खुनाच्या घटनांनी हादरले आहे, सोबतच खुलेआम अवैध धंदे वाढले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांकडून कडक कारवाई आणि 'सिंघम' भूमिकेची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहे.