Samruddhi Highway: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते करण्यात आला असून, आता हा महामार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या सुखकर प्रवासाठी भक्कम असा टोल देखील द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर आमदार व खासदारांच्या (MLA-MP) वाहनांनाही टोल भरावा लागणार आहे. यात फक्त मोजक्या महत्वाच्या लोकांच्या वाहनासाठी सूट देण्यात आली आहे. 


समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 10 डिसेंबर 2032 पर्यंत म्हणजेच पुढील तब्बल दहा वर्षे टोल आकारला जाणार आहे. ज्यात कार, जीप, व्हॅन या हलक्या वाहनांना 10 डिसेंबर 2025 पर्यंत प्रति कि.मी.1.73 रुपये टोल आकारला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होऊन शेवटच्या दीड वर्षात 2.92 रुपये प्रति कि.मी. या दराने पथकर आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात दिली गेली आहे. 


कोणत्या वाहनाला कसा असणार टोल...


कार, व्हॅन, जीप आदी हलक्या वाहनांसाठी 


31 मार्च 2025 पर्यंत 1.73 रुपये प्रति कि.मी. टोल असणार आहे. 
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत यात वाढ होऊन ते 2 रुपये 6 पैसे प्रति कि.मी. होईल. 
1 एप्रिल 2028 ते 31 मार्च 2031 पर्यंत 2.45 रुपये प्रति कि.मी. टोल होईल 
1 एप्रिल 2031 ते 10 डिसेंबर 2032 पर्यंत टोलची किमंत वाढून प्रति कि.मी. 2.92 रु. होईल.


हलकी व्यावसायिक, मालवाहू वाहने तसेच मिनी बस


31 मार्च 2025 पर्यंत 2.79 रुपये प्रति कि.मी. टोल असणार आहे.
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत यात वाढ होऊन3 रुपये 32 पैसे प्रति कि.मी. होईल 
1 एप्रिल 2028 ते 31 मार्च 2031 पर्यंत 3 रुपये 96 पैसे प्रति कि.मी. टोल होईल.
1 एप्रिल 2031 ते 10 डिसेंबर 2032 पर्यंत टोलची किमंत वाढून प्रति कि.मी. 4 रुपये 71 पैसे होईल.


बस अथवा ट्रकसाठी (दोन अ‍ॅक्सल)


31 मार्च 2025 पर्यंत 5.85 रुपये प्रति कि.मी. टोल असणार आहे.
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत यात वाढ होऊन6 रुपये 97 पैसे प्रति कि.मी. होईल.
1 एप्रिल 2028 ते 31 मार्च 2031 पर्यंत 8 रुपये 30 पैसे प्रति कि.मी टोल होईल.
1 एप्रिल 2031 ते 10 डिसेंबर 2032 पर्यंत टोलची किमंत वाढून प्रति कि.मी. 9 रुपये 88 पैसे होईल.


तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी


31 मार्च 2025 पर्यंत 6.38 रुपये प्रति कि.मी. टोल असणार आहे.
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत यात वाढ होऊन7 रुपये 60 पैसे प्रति कि.मी. होईल.
1 एप्रिल 2028 ते 31 मार्च 2031 पर्यंत 9 रुपये 05 पैसे प्रति कि.मी. टोल होईल.
1 एप्रिल 2031 ते 10 डिसेंबर 2032 पर्यंत टोलची किमंत वाढून प्रति कि.मी. 10 रुपये 78 पैसे. होईल. 


यांना मिळणार सुट...


समृद्धी महामार्गावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, लोकसभेचे सभापती व राज्यसभेचे अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौर्‍यावरील परदेशी मान्यवर, लष्कर व पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिकांनाच टोलमाफी असणार आहे.