....तर केंद्राला व्हेंटिलेटर साभार परत करू- सुभाष देसाई
मराठवाड्याला मिळालेल्या आणि राज्यालाही मिळालेले व्हेंटिलेटर उपयुक्त नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींबरोबरच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल्या.
PM Care पीएम केअरमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. मराठवाड्याला मिळालेल्या आणि राज्यालाही मिळालेले व्हेंटिलेटर उपयुक्त नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींबरोबरच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल्या. यात सर्वाधिक औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला मिळालेल्या व्हेंटिलेटरचं प्रकरण अधिक गाजलं.
औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी वेंटिलेटर उपयोगात येत नाहीत असं सांगत, केंद्रानं चांगले व्हेंटिलेटर द्यायला हवे होते असे म्हटले आहे. व्हेंटिलेटर सातत्यानं नादुरुस्त होत असतील तर केंद्राला साभार परत करू हे देखील सांगायला पालक मंत्री सुभाष देसाई विसरले नाहीत.
यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांचं खंडन करताना म्हटलं आहे की, 'सर्वच व्हेंटिलेटर खराब किंवा नादुरूस्त आहेत, हा आरोप चुकीचा आहे. जे व्हेंटिलटर खराब आहेत ते बदलून घेतले पाहिजे, संबंधित कंपनीवर कारवाई देखील केली जावी, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. यातील काही व्हेंटिलेटर खराब असतीलही त्यामुळे सर्वच व्हेंटीलेटर खराब आहेत असे म्हणणे योग्य नाही'. घाटी रुग्णालयात कित्येक दिवस व्हेंटिलेटर पडून होते, ते उघडले नाहीत. त्यामुळे त्यात बिघाड झाला असंही फडणवीस म्हणाले.
मराठवाड्याला केंद्राकडून 150 व्हेंटिलेटर आले होते. घाटी रुग्णालय यांना त्यातील काही व्हेंटिलेटर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यात आणि औरंगाबाद शहरातील काही खासगी रुग्णालयाला वापरण्यासाठी दिले होते. मात्र हे व्हेंटिलेटर कोविड रुग्णांच्या वापरासाठी योग्य नसल्याचं समोर आला आहे. घाटी रुग्णालयाला मिळालेले व्हेंटिलेटर सातत्यानं नादुरुस्त होत असल्यानं, त्याची तपासणी करण्यासाठी पाच तज्ञ डॉक्टरांची टीम नेमण्यात आली होती. त्या अहवालातही हे व्हेंटीलेटर कोविड रुग्णाच्या वापरासाठी योग्य नाहीत. आयसीयूमध्ये वापरू शकत नाही असे निष्कर्ष काढले होते.
कोविड व्यवस्थापनाचा बोजवारा; सत्ताधाऱ्यांपैकी जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्या- माधव गोडबोले
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मिळालेल्या व्हेंटिलेटर बाबत हे स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना घाटी रुग्णालयाला भेट देऊन व्हेंटिलेटर पाहण्याचा सल्ला दिला. आणि पुन्हा एकदा हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी हे व्हेंटिलेटर कचऱ्यात फेकून देण्याच्या लायकीचे असल्याचं म्हटलं आहे. औरंगाबादच्या वेंटिलेटर च्या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. वेंटिलेटरच्या प्रकरनात आता राजकारणही होऊ लागला आहे. या सगळ्यात सामान्य रुग्ण मात्र वेंटिलेटर अभावी मृत्यूमुखी पडत आहेत. सर्वसामान्य लोक, कंपन्या आणि सेलिब्रिटींनी पीएम केअरफंडाला भरभरून दान दिलं, त्यातून हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे या वेंटीलेटरच्या प्रकरणात काय तो सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावून सामान्य रुग्णांना उपयोगात यावे हीच अपेक्षा आहे..