औरंगाबाद : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी गुंडांकरवी धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी शपथपत्र दाखल करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्‍याकडे चार आठवड्यांची मुदत मागितली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. 


खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी संबंधित सकारात्मक अहवाल तयार करुन देण्यासाठी गुंड सईद खानमार्फत दबाव आणून मारहाण केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील सनदी लेखापालांनी पोलीस ठाण्यात आणि पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी दिल्या. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने खंडपीठात धाव घेतली असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
 
सनदी लेखापाल उपेंद्र गुणवंतराव मुळे यांचे खासदार गवळी यांच्याशी 2008 पासून व्यवसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यावधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे वाशीमचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणात खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्र तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेंबर 2019 मध्ये सांगितले होते. 


मात्र, मुळे यांनी बेकायदेशीर ऑडिट रिपोर्ट तयार करण्यास नकार दिला होता. तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकून रिपोर्ट बनवण्यास गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजी पोलीस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह सईद खान व अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध तक्रार दिली होती. 


त्यानंतर खासदार गवळी यांनी हस्तकामार्फत उलट मुळे यांच्याविरुध्द अपहाराचे पाच खोटे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल केले. याशिवाय मुळे यांच्या घरी गुंड येऊन धमक्या देऊ लागल्यामुळे ते घर सोडून हॉटेलात राहू लागले होते. पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे 12 नोव्हेंबर 2020 रोजी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर 2 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. मुळे यांच्या बाजूने अ‍ॅड. अमोल गांधी यांनी न्यायालयात बाजू मांडली.