औरंगाबाद : चोरी करायची आणि मिळालेल्या पैशातून समाजकार्य करायचं, हा टिपीकल 'रॉबिनहूड' फंडा. चित्रपटांमध्ये दिसणारा हा सीन औरंगाबादेत मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाला. सव्वाशेपेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला बुलडाण्याचा चोर किशोर वायाळला औरंगाबाद पोलिसांनी गजाआड केलं, त्यावेळीही चोरीच्या पैशातून शिर्डी संस्थानाला दान करण्याच्या तयारीत असल्याचं त्याने सांगितलं.


किशोर वायाळचं काम चोरीचं, मात्र आव समाजसेवकाचा. वैजापूरच्या एका घरातून तब्बल 72 तोळं सोनं त्याने चोरलं. पोलिसांनी बऱ्याच मेहनतीनंतर किशोर वायाळला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून सोनं हस्तगत केलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आल्या.

किशोर वायाळ मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेरा गावचा. गावात त्याचं आलिशान घर आहे. इतकंच नाही, तर तीन महागड्या गाड्याही आहेत. धक्कादायक म्हणजे त्याचं राज्यासह राज्याबाहेरही नेटवर्क आहे. चोरीला जाताना तो स्थानिक नेटवर्कमधील चोराला सोबत घ्यायचा. त्याला दिवसाला एक हजार रुपये आणि चोरीच्या पैशांतून बक्षिसही द्यायचा. त्याने अनेक ठिकाणी कामासाठी असे 'चोर' ठेवले होते.

चोरी करताना तो दुपारची वेळ निवडायचा. साथिदारांकडून घरात कुणी नाही, याची माहिती घ्यायचा. त्यानंतर घर फोडून चोरी करण्याची त्याची पद्धत होती. चोरी केल्यानंतर पापक्षालनासाठी तो पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करायचा.

चोरीचा मुद्देमाल विकून तो आपल्या गावात यायचा. मात्र गावात त्याचं वेगळंच रुप होतं. समाजसेवकाचा आव आणून तो लोकांना मदत करायचा. त्याने 'मामा' नावाची एक संस्थाही स्थापन केली होती. यातून त्याने गावात सामूहिक विवाह लावले, गावाला टँकरने पाण्याची सोय केली. गावातील शाळेसाठीही काम केलं.

चोरीच्या एकूण रकमेतून तो किमान 10 टक्के समाजकार्य, दानधर्मासाठी सुद्दा करायचा. ज्या 72 तोळे सोनं चोरीत तो गजाआड गेला, त्या चोरीच्या पैशातून तो शिर्डीच्या साई संस्थानला रुग्णवाहिकाही दान करणार होता. मात्र पोलिसांनी तपास करत शिताफीने त्याला अटक केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्याच्यावर औरंगाबादबाहेरही तब्बल 123 गुन्हे दाखल आहेत.