औरंगाबाद : हंडाभर पाण्यासाठी नाशिकमध्ये महिलांना कसरत करुन विहिरीत उतरावं लागत असल्याचं आपण पाहिलं. एक हंडा पाण्यासाठी औरंगाबादमध्ये रस्त्यावर टाकलं जाणारं पाणी हंड्यात भरताना पाहिलं. दुष्काळाचं भयाण चित्र दाखवणारी आणखी एक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. एक कळशी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांना रेल्वेने 14 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी स्टेशनवर हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरची वेळ झाली, की हातात हंडा घेऊन ट्रेनची वाट पाहणारी माणसं 'रेल्वे आली, पाणी भरायला चला...' अशा हाका-आरोळ्या देताना ऐकू येतात. त्यानंतर ट्रॅकशेजारी असलेले अनेक जण हंडा-कळशा घेऊन रेल्वेच्या दिशेने धाव घेतात.

एका बाजूने प्रवासी रेल्वेमध्ये चढतात, तर दुसऱ्या बाजूने जास्तीत जास्त हंडे रेल्वेत चढवण्यासाठी चिमुकले, बायाबापड्या आणि वयोवृद्धांचीही कसरत सुरु होते. दहा वर्षांच्या सिद्धार्थ ढगे आणि साठीपार केलेल्या सीताबाई कांबळे यांच्यासारख्या अनेकांचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा हा दिनक्रम आहे.



औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर गाडीचं औरंगाबाद हे शेवटचं रेल्वे स्टेशन. एकीकडे उतरणाऱ्यांना जायची घाई असते, तर चढणाऱ्यांना जागा पकडण्याची. तेव्हा, दुसरीकडे रेल्वे धुण्यासाठी आणि रेल्वेत पाणी भरण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असलेल्या पाईपमधून पाणी भरण्यासाठी सिद्धार्थ-सीताबाईंसारख्या गावकऱ्यांची कसरत सुरु होते.

गर्दी नसेल तर नशीब, मात्र औरंगाबाद स्टेशनवर केवळ पाच मिनिटासाठी ट्रेन थांबली असताना हंडे भरणं म्हणजे दिव्यच. गर्दी असेल तर इतर प्रवासीही हंडे भरु देत नाहीत आणि पोलिसही हंडे फेकून देतात.

या भागातील काही नागरिकांनी आता रेल्वेतून पाणी आणणं बंद केलं आहे. रेल्वे रुळांशेजारी राहणाऱ्या ज्ञानोबा लोखंडे यांना असंच पोलिसांनी पाणी भरताना हटकलं. त्यांचा हंडा फेकून दिला. तेव्हापासून ते स्टेशनला पाण्यासाठी गेले नाहीत.

दुसरीकडे, मुलं-बाळं रेल्वेने पाणी आणण्यासाठी गेली आहेत, त्यामुळे कामावर गेलेल्या आई-बापांचा जीव टांगणीला असतो. गाडी परत येते तेव्हा आई-बाप डोळ्यात प्राण आणून मुलांची स्टेशनवर वाट पाहत असतात. जेव्हा लेकरु आणि हंडाभर पाणी नजरेस पडतं, तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडतो.

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक दुष्काळ पाहिले, पण अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. दोन वर्षांपूर्वी याच दुष्काळामुळे लातूरकरांना रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं आणि आता औरंगाबादेत रेल्वेने पाण्यासाठी 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. आजही हे वास्तव आहे मराठवाड्याच्या भयाण दुष्काळाचं. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैशाने पाणी विकत घेतात. मात्र ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना पाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागतो, हे सत्य आहे.