औरंगाबाद : शाळेतील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादेत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली. तरुणीच्या नातेवाईकांनी लिपीक संजय घुगरेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आरोपीने विद्यार्थिनीला बारावीच्या निरोप समारंभात येऊन धमकावलं होतं. त्यानंतर घरी येऊन तिने आत्महत्या केली. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील उंडनगावात सोमवारी रात्री हा प्रकार घडला.

अजिंठा पोलिसात दाखल तक्रारीनुसार आरोपी संजय घुगरे हा सिल्लोडमधील एका खाजगी शाळेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. तो दररोज बसने प्रवास करतो. संबंधित तरुणीही उंडनगावहून बसने प्रवास करत असे. प्रवासात आरोपी संजय तिची रोज छेड काढत असल्याचा आरोप आहे.

'मी म्हणेन तसं न वागल्यास माझ्याकडे असलेले तुझे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन. तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेन' अशी धमकी घुगरे देत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

रोजच्या त्रासाला कंटाळून युवतीने याबाबत आपल्या पालकांना सांगितलं होतं. त्यांनी समजावूनही संजय घुगरेने छेडछाड बंद केली नाही. त्यामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत आहे.