औरंगाबाद : औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी 'एबीपी माझा'ने माहिती घेतल्यानंतर हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे.


या व्हिडीओत काही लोक एका महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करत असल्याचं दिसत आहे. बाराशे स्क्वेअर फुटाच्या जागेसाठी तिला विवस्त्र करुन जबर मारहाण करण्यात आली. अंगावर कपडे नसल्याने ग्रामस्थ तिला झाकण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपींनी त्यांना पिटाळून लावलं.


पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलिसात होमगार्ड पदावर काम करते. तिच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या वयोवृद्ध आईला तिथून पिटाळून लावण्यासाठी आरोपी धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबुराव वाघ आणि रामदास वाघ यांनी पीडितेला नग्न करुन मारहाण केली.

या प्रकरणी सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्याला मारहाण झाली असूनही पोलिसांनी आम्हालाच अटक करुन मारहाण करणाऱ्यांना मात्र मोकाट सोडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.