आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा, रामदास आठवलेंचा भाजपला इशारा
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 22 Feb 2019 07:48 AM (IST)
आम्ही भाजपचा सन्मान करतो. त्यांनीही आमचाही सन्मान करावा असंही आठवले म्हणाले. आम्ही कुणाला जिंकवू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी आम्ही कुणालाही पाडू शकतो असं सूचक विधानही आठवले यांनी केले.
औरंगाबाद : युती बाबत भाजप शिवसेनेची बैठक झाली, मात्र आम्हाला जागा देण्याबाबत चर्चा झाली नाही. हा प्रकार धक्कादायक असल्याचे मत केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी औरंगाबाद मध्ये व्यक्त केले आहे. आम्ही भाजपचा सन्मान करतो, त्यांनीही आमचा सन्मान करावा, असेही आठवले म्हणाले. तसेच यामुळे आम्ही नाराज झालो असल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले आहे. रिपाइंला किमान एक जागा मिळायला हवी, दक्षिण मध्य मुंबईची जागा आम्हाला हवी असल्याची मागणी आहे, गेल्यावेळी सातारा आम्हाला मिळाली होती. मात्र आता ती शिवसेनेच्या कोट्यात आहे. शिवाय आम्हाला हव्या असलेल्या विधानसभेच्या 8 ही जागी शिवसेना विजयी झालेली आहे. त्यामुळे त्या जागाही मिळण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. आम्ही भाजपचा सन्मान करतो. त्यांनीही आमचाही सन्मान करावा असंही आठवले म्हणाले. आम्ही कुणाला जिंकवू शकत नाही हे जरी सत्य असलं तरी आम्ही कुणालाही पाडू शकतो असं सूचक विधानही आठवले यांनी केले. आम्हाला कुणीही वापरून घेवू नये असेही आठवले म्हणाले.