औरंगाबाद : प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी दुचाकी चोरी करणारे चोर, मजा-मस्ती करण्यासाठी दुचाकी चोरणारे आपण पाहिले आहेत. परंतु आता दिवसा लोकांना अंगात देव येतो असे सांगून लुटणारे आणि रात्री मोटारसायकल चोरणारे भोंदूबाबा/चोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडील 19 दुचाकी जप्त केल्या आहेत.


अशोक तामचीकर (28) हा भोंदूबाबा औरंगाबादच्या नारेगाव परिसरात राहतो. अमुक एक देव अंगात येतो आणि तो अंगात आला की तो कुठलाही इलाज बरा करु शकतो, असा दावा करुन तो लोकांना लुटत होता. तामचीकर एवढ्यावरच थांबला नाही. तर हा भोंदूबाबा रात्री लोकांच्या दुचाकी चोरत होता.

चोरलेल्या दुचाकी तामचीकर अवघ्या दोन ते तीन हजारांत लोकांना विकायचा. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या बाबाच्या दरबाबातच छापा घातला. तिथे सापडलेल्या गाड्यांच्या नंबरप्लेटवरुन तपास केला. तपासात पोलिसांना तब्बल 9 दुचाकी सापडल्या.

या गुन्ह्यात तामचीकर बाबासोबत त्याचा एक भक्त आणि एक सहकारीदेखील होता. हे तिघेही रात्रीच्या वेळी दुचाकी चोरायचे. आपली आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्या दुचाकी कवडीमोल भावाने लोकांना विकायचे. इतक्या स्वस्तात दुचाकी विकणे बाबाच्या आंगलट आलं आहे. दरम्यान, केवळ दुचाकीच नाही तर भोंदूबाबा बणून त्याने किती लोकांना लुटलंय, याचादेखील पोलीस तपास करत आहेत.