औरंगाबाद : पाच कोटींच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करुन हत्या करणाऱ्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. औरंगाबाद सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघा दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.


दोषींना कलम 302 म्हणजे हत्या आणि कलम 364 म्हणजे पैशासाठी अपहरण या कलमांअंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांनुसार हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' गुन्हा असल्यामुळे आरोपींना मरेपर्यंत फाशी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. विशेष म्हणजे मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोर्टाने ज्या वेळी निकाल दिला, त्यावेळी वर्धनच्या आई ढसाढसा रडल्या.

काय आहे प्रकरण?

27 फेब्रुवारी 2017 रोजी आरोपींनी आधी वर्धनचे अपहरण केलं, त्यानंतर दौलताबाद घाटात त्याची रुमालाने गळा आवळून हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट न लावता तो कारच्या डिकीत ठेवून ते कॉलनीत परतले.

दहा वर्षांच्या वर्धनच्या शरीरावर तब्बल 31 घाव होते. आरोपींनी टिळकनगर परिसरातील नाल्यात वर्धनचा मृतदेह फेकला. त्यानंतर वर्धनच्या घरी जाऊन काही घडलंच नाही, अशा आविर्भावात आरोपी फिरत होते.

दोषी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे

पोलिसांना आरोपी अभिलाषच्या घराजवळ पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चिठ्ठी सापडली होती. तपासात आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि आरोपी श्याम मगरे यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडले. खटल्यावेळी म्हणजे गेल्या सात महिन्यांत 30 वेळा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. विशेष म्हणजे अवघ्या सात महिन्यांत सुनावणी पूर्ण झाली. सुनावणी जलदगती कोर्टात न होता नियमित कोर्टासमोर सुरु होती. अवघ्या दीड वर्षात आरोपी शिक्षेस पात्र ठरले आहेत. या खटल्यानिमित्त रुमाल हेदेखील घातक शस्त्र ठरू शकते, हे सिद्ध झाले.

पोलिसांना सापडलेली खंडणीची चिठ्ठी

या प्रकरणी 750 पानी दोषारोपपत्र ,100 पानी निकालपत्र दाखल करण्यात आले. 41 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून डीएनए तपासणी, मोबाइल टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही चित्रिकरण अशा तांत्रिक पुराव्यांसह परिस्थितीजन्य पुरावाही महत्त्वाचा ठरला.

या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना कलम 302 (हत्या), 363 (अ) (पैशासाठी अपहरण), 201 (पुरावा नष्ट करणे), 120 (ब) (कटकारस्थान रचणे) आदी कलमान्वये कोर्टात दोषी ठरवण्यात आले आहे.

वर्धनचा मृतदेह फेकलेला नाला

शिक्षा सुनावताना वर्धनचे आजी-आजोबा आणि आई कोर्टरुममध्ये उपस्थित होते. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. विशेष म्हणजे मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोर्टाने ज्या वेळी निकाल दिला, त्यावेळी वर्धनच्या आई ढसाढसा रडल्या.