औरंगाबाद : औरंगाबादेतील विद्यार्थिनीचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरुवातीला आकांक्षा देशमुखने आत्महत्या केल्याचं वाटत असतानाच तिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं. बीडच्या माजलगावात राहणारी ही तरुणी फिजिओथेरपिस्ट होण्याचं स्वप्न घेऊन औरंगाबदच्या एमजीएम महाविद्यालयात आली. पण दोन दिवसांपूर्वी तिच्यासोबत जे झालं, त्याची कल्पना कुणालाही नव्हती.


आकांक्षाच्या हत्येशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

आकांक्षाला दहा डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता हॉस्टेलमधील मुलींनी पाहिलं असल्याचा दावा केला जात आहे. हॉस्टेलमधील सीसीटीव्हीमध्येही ती रात्री साडेअकरा वाजता दिसली. रात्री 9 वाजता हॉस्टेलमध्ये रोज हजेरी घेतली जाते. दुसऱ्या दिवशी, म्हणजे 11 डिसेंबरला रात्री 9 वाजताच्या हजेरीला आकांक्षा आली नाही, त्यावेळी तिच्या रुममध्ये महिला कर्मचारी गेल्या. तेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ढकलला त्यावेळी आकांक्षाचा मृतदेह संशयास्पदरित्या एका बेडशीटवर पडलेला होता. त्यानंतर वॉर्डननी पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेह एमजीएम रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या असावी असा संशय होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यावेळी गळा दाबून तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांची तपास चक्र बदलली. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन या प्रकरणात 302 चा  गुन्हा दाखल केला.

औरंगाबाद शहरातील नामांकित एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात अशाप्रकारे एखाद्या विद्यार्थिनीचा खून कसा होऊ शकतो. आकांक्षा गेल्या पाच वर्षांपासून याच गंगा हॉस्टेलमध्ये राहून फिजिओथेरपीचं शिक्षण घेत होती. आता ती फिजिओथेरपीच्या पीजीच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होती. आकांक्षा ही मूळची बीड जिल्ह्यातील माजलगावची. ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी.

पोलिसांनी आकांक्षाची रुम तपासली त्यावेळी एक छोटं टेबल उलटं पडलेलं होतं. रुममधील आरशाचे तुकडे झाले होते. एक ओढणी खाली पडलेली होती. आणि ती ज्या कॉटवर झोपायची तो कॉटही सरकलेला होता. आकांक्षा ज्या रुममध्ये राहत होती त्या रुममध्ये एकूण तीन मुली होत्या. त्यातल्या दोन मुली पॉलिटेक्निकचं शिक्षण घेतात. त्यांची परीक्षा संपल्यामुळे त्या नऊ तारखेला घरी गेल्या होत्या. त्यामुळे आकांक्षा रुममध्ये एकटीच होती.

पोलिसांना रुममध्ये एक डायरी मिळाली. त्या डायरीत काय मजकूर आहे, हे समजू शकलेलं नाही. आकांक्षा ज्या रुममध्ये राहत त्या दोन रुममेटचीही चौकशी होणार आहे. हॉस्टेल रेक्टर, कर्मचाऱ्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

मुलींच्या हॉस्टेलच्या बाजूला नव्याने बांधकाम सुरु आहे. या बांधकामावरुन कोणीतरी येऊन आकांक्षाच्या रुममध्ये घुसल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी पाच दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यातून काही सुगावा लागतो का, याचाही पोलिस तपास घेत आहेत. गंगा हॉस्टेलमध्ये एकूण 450 मुली राहतात. तीन मजल्याचे वस्तीगृह आहे.

'माझा'चे सवाल

आकांक्षाचा गळा आवळून खून झाला...
तर कुणालाच काही ऐकू कसं आलं नाही?
वसतिगृहाचे सुरक्षारक्षक काय करत होते?
मृत्यू झाल्याचं कळण्यासाठी 24 तास का लागले?
आकांक्षाची चौकशी करण्यासाठी कुणीच कसं गेलं नाही?
एमजीएम हॉस्टेलमधल्या विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत... आकांक्षाला न्याय मिळायला हवा...