Aurangabad News : आपले हट्ट पूर्ण न झाल्याने किंवा आपल्या मनासारखे न झाल्याने अनेकदा किरकोळ कारणावरुन मुलं टोकाचं पाऊल उचलतात. याबाबतच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना आता औरंगाबादमधून (Aurangabad) समोर आली आहे. या घटनेत कॉलेजमधून घरी आल्यानंतर स्वयंपाक करण्यावरुन तिचे कुटुंबीयांशी वाद झाले. म्हणून नाराज झालेल्या एका महाविद्यालयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना औरंगाबाद येथील सिडको परिसरात घडली आहे.
सातवीत असतानाच बॉक्सिंगमध्ये सर्वोच्च पदक मिळवण्याचे स्वप्न पाहिलेल्या तेजस्विनी विलास अवकाळे हिने 12 फेब्रुवारी रोजी घरातच रागाच्या भरात विषारी द्रव्य घेतले. तिचा मंगळवारी (14 फेब्रुवारी) रात्री खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सिडको परिसरात आई-वडिलांसह राहणारी तेजस्विनी बारावीला शिकत होती. कॉलेजमधून घरी आल्यानंतर स्वयंपाक करण्यावरुन तिचे कुटुंबीयांशी वाद झाले. रागावलेल्या तेजस्विनीने खोलीत जात विषारी औषध घेतले.
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदकं जिकली, पण रागाच्या भरात आयुष्य संपवलं
बराच वेळ होऊनही तेजस्विनी खोलीबाहेर येत नसल्याने वडिलांनी जाऊन पाहिले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यूशी संघर्ष मंगळवारी रात्री नऊ वाजता संपला. तेजस्विनीने गेल्या वर्षभरात तब्बल चार वेळेस राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये टॉप तीनमध्ये पदके प्राप्त केली. जानेवारीत पालघरमध्ये झालेल्या अंडर 19 मध्ये तिने सिल्व्हर मेडल मिळवले होते. कुटुंबाचा जबाब नोंदवला असता 12 फेब्रुवारी रोजी तिला रागावल्यानंतर हा प्रकार झाल्याचे समोर आले, असे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
सांभाळणं असह्य झाले, चिडचिड व्हायची, निर्दयी आईकडूनच दोन चिमुकल्यांची हत्या
दरम्यान आईनेच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची घटना औरंगाबादच्या सादात नगर परिसरात 6 फेब्रुवारीला उघडकीस आली होती. तर अल्पवयीन मुलांचा आईने झोपेतच जीव घेतल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र आईने आपल्यास पोटच्या लेकरांचा जीव का घेतला याचे कारण समजू शकले नव्हते. दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी महिलेने अखेर हत्या केल्याचं कबूल करत, “मला मुलं सांभाळणं असह्य झालं होतं. त्यामुळे चिडचिड व्हायची, म्हणून दोन्ही मुलांचा जीव घेतल्याचं महिलेने सांगितले. याप्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संबंधित बातम्या :