Aurangabad News: लहानापासून संभाळ केलेल्या एखांद्या पाळीव प्राण्याचा लळा लागला की, ती आपलीशी कधी होतात हे कळतच नाही. तर जीवापाड प्रेम करणाऱ्या आशा एखाद्या जनावराचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याचा संभाळ करणाऱ्या कुटुंबावर शोककळा पसरते. अशीच काही घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली आहे. तब्बल 22 वर्ष जीवापाड प्रेम करणाऱ्या घोड्याचा अचानक निधन झाल्याने जानराव कुटुंब शोकाकूल झाले. विशेष म्हणजे 'राजा' नामक या घोड्याने महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकावलं होतं. तर त्याच्या निधनानंतर जानराव कुटुंबाने घोड्याचा दशक्रिया विधी केला, काही सदस्यांनी मुंडण केले, नातेवाईक, ग्रामस्थांना लाडूची पंगत दिली, प्रवचनही ठेवले! यानिमित्त पाळीव प्राण्यांप्रती असलेली आगळी प्रेमभावना स्थानिकांनी अनुभवली.


वैजापूरच्या खंडाळा गावातील शेतकरी गोरख (टिलू) पुंजाबा जानराव आणि त्यांच्या कुटुंबासाठी 'राजा' नामक घोडा विशेष लाडका होता. तब्बल 22 वर्षे या कुटुंबाने राजाचं आपल्या लेकराप्रमाणे सांभाळ केला. या 'राजा'ने बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्र केसरी पटकावत विजेतेपद मिळवलं होतं. एवढंच नाही तर राजाने आत्तापर्यंत एक हजारपेक्षा अधिक लहान-मोठ्या शर्यती जिंकल्या होत्या. औरंगाबादसह, अहमदनगर, नाशिक, कल्याण, मुंबई, जळगाव आदी जिल्हे व शहरांतील मैदान राजाने गाजवले होते. बैलगाडी शर्यतमध्ये राजाच्या नावाची राज्यात एक वेगळी ओळख होती. त्यामुळे बाबासाहेब, ज्ञानेश्वर व गोरख जानराव हे तिघे बंधू "राजा'ला आपल्या लेकरांप्रमाणे जीव लावत.


दशक्रिया विधी आणि उत्तरकार्यही!


आपल्या 22 वर्षाच्या काळात राजाने राज्यभरातील अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारत आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. पण अशातच 'राजा' वृद्धापकाळाकडे झुकला होता. त्यातच दहा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. राजाच्या निधनाने जानराव कुटुंब दुःखात बुडाले. तर 'राजा' प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कुटुंबाने दहा दिवसांचा दुखवटा पाळला. एवढंच नाही तर माणसाच्या निधनानंतर विधी करतात तसा दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य केले. सोबतच तिघा बंधूंनी मुंडण केले. नातेवाईक, मित्र मंडळी, गावकऱ्यांना लाडूची पंगत दिली. पांडुरंग शास्त्री महाराज यांचे प्रवचन झाले. 


'राजा' कुटुंबातील सदस्य बनला


यावर बोलताना गोरख जानराव म्हणाले की, 'राजा' घोड्यामुळे परिसरात जानराव कुटुंबाची ओळख निर्माण झाली होती. 22 वर्षांपासून तो सोबत होता. आमच्यासाठी तो कुटुंबातील एक सदस्यच बनला होता. त्याच्या जाण्याने कुटुंबाला दुःख झाले. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्याचा दशक्रिया आणि अन्य विधी केले.