Aurangabad Crime News: औरंगाबादच्या गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील पेंढापुर शिवारात ऊसाच्या शेतात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाचा तपास लावत, हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 36 तासाच्या आत या खुनाच्या घटनेचा पर्दाफाश करत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सुनिल प्रकाश जमधडे असे मयत तरुणाचे नाव असून, अक्षय बापुसाहेब विर (वय 21वर्ष रा. पान रांजणगांव (खुरी) ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. तर त्याचा आणखी एक साथीदार सद्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी ढोरेगांव जवळील पेंढापुर फाटयाच्या मागील ऊसाच्या शेतात तोडणी सुरु असतांना कामगारांना एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते. ऊसाच्या वाढयाच्या खाली पडलेल्या या प्रेताला कोणीतरी अज्ञात इसमाने चेहरा विद्रुप करून मारल्याचे दिसून आले. त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत पाहणी करून, तपास केला असता हा मृतदेह सुनिल प्रकाश जमधडे (रा. पाटोदा ता. जि. औरंगाबाद० याचा असल्याचे समोर आले होते. तर या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरुन खात्रीलायक माहिती मिळाली की, मयत सुनिल प्रकाश जमधडे हा 1 जानेवारीला पंढरपुर येथील विरांश वाईन शॉप येथे अक्षय विर व त्याचे सोबतच्या अनोळखी इसमासह दारु विकत घेवून गेला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षयच्या पान रांजणगांव (खुरी) येथील राहत्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुनिल जमधडेचा आपणच खून केला असल्याची कबुली त्याने दिली.
गळ्यावर पाय ठेवून फोटो काढले...
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, 1 जानेवारीला अक्षय आणि त्याचा एक मित्र मयत सुनिल जमधड यास भेटले. त्यानंतर सुनीलच्या मोटारसायकलवर बसून पंढरपुरला पोहचत, तेथील विरांश वाईन शॉप येथून दारु विकत घेतली. तसेच सुनीलला दारु पाजुन त्याच्या मोटारसायकलवर ढोरेगांव येथे जेवणासाठी निघाले. मात्र रस्त्यातच अक्षय आणि सुनील यांच्यात भांडण झाले. यावेळी सुनीलला अक्षयने आधी काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यास ढोरेगांव ते पेंढापुरला जाणाऱ्या रोडलगत फौजी ढाच्याच्या पाठीमागे एका ऊसाचे शेतात घेऊन गेला. तिथे गेल्यावर अक्षयच्या मित्राने सुनीलचा रुमालाने गळा आवळला. तर अक्षयने सुनीलच्या गळ्यावर पाय ठेवुन मोबाईलमध्ये त्याला मारत असतांनाचे फोटो काढले.
ओळख पटू नयेत म्हणून चेहरा विद्रुप
अक्षय आणि त्याच्या एका मित्राने सुनीलला बेदम मारहाण केली. मात्र दोघेही एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर सुनिल जमधडे याची ओळख पटू नये म्हणुन त्याच्या तोंडावर दगडाने मारुन त्याचा चेहरा विद्रुप करुन त्यास जिवे ठार मारले. त्यानंतर सुनीलचा मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून, त्यावर ऊसा वाढे टाकून फरार झाले.