Aurangabad News: औरंगाबादमधून (Aurangabad) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं अंदाजे 700 जणांची प्रकृती बिघडली. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना (Abdul Qadeer Moulana) यांच्या मुलाचा काल (बुधवारी) लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा बुधवारी औरंगाबादमध्ये पार पडला. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. मात्र याचवेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली. पाहता-पाहता अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 700 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पाहता-पाहता 700 जणांना विषबाधा...
औरंगाबाद शहरात संध्याकाळी कदीर मौलाना यांच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी मोठ्याप्रमाणावर लोकांना आमंत्रण देण्यात आले असल्याने, लग्नात गर्दी देखील मोठी होती. या शाही लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे पकवान बनवण्यात आले. मात्र जेवणानंतर अनेकांना त्रास सुरु झाला. पाहता पाहता त्रास होणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार 700 लोकांना विषबाधा झाली असल्याचे बोलले जात आहे.
एकच धावपळ!
लग्नसमारंभ सुरु असतानाच जेवणानंतर लोकांना त्रास सुरु झाला. अचानक मोठ्याप्रमाणावर ही संख्या वाढू लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. त्यामुळे या सर्वांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात देखील अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.
कदीर मौलाना समर्थकाची माहिती...
याबाबत कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्रास होत होता. मात्र कोणेही गंभीर नाही. तसेच सर्वांना रात्रीची तपासून डॉक्टरांनी तात्काळ सुट्टी दिली आहे. त्यामुळे कोणेही गंभीर नाहीत. तसेच हा सर्व प्रकार कदीर मौलाना यांच्या घरी घडला नसून, जेवणाचा कार्यक्रम मुलीकडे होता. तर कदीर मौलाना यांच्याघरी होणारा कार्यक्रम आज आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे , कदीर मौलाना यांच्या समर्थकाने प्रतिक्रीया दिली आहे.