Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad ) पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे (Bhausaheb Tarmale ) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव पैठण) असे आरोपींचे नावं आहे.


काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती. ज्यात भाऊसाहेब तळमळे यांच्या आई सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यात त्यांचा विजय देखील झाला होता. दरम्यान याच निवडणुकीचा राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांची घटनास्थळी धाव!


बोकुड जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळतात बिडकीन पोलीस ठाण्यातील पथकाने गावात धाव घेतली. त्यानंतर जखमी तळमळ यांना रुग्णालयात हलवण्यात आले. गावात झालेल्या वादानंतर तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.