Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. त्यातच फेबुवारी महिन्यात जी 20 (G-20) परिषदेचे सदस्य औरंगाबादमध्ये येणार असल्याने महानगरपालिका रस्त्यावरील अतिक्रमण काढत असून, रस्ते चकचकीत करत आहे. दरम्यान आज देखील मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा रस्त्यावरील 30 अतिक्रमणे जमिनदोस्त केली आहे.
मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार ऐतिहासिक रस्त्याच्या मार्गावर जी-20 अंतर्गत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आलेली आहे. या महत्त्वाच्या कामात काही अतिक्रमणे अडथळा निर्माण करत होते. ज्यात बेगमपुरा चौकपर्यंत काही नागरिकांनी रस्त्यावर पंधरा बाय ते पंधरा बाय आणि पाच बाय तीस या आकाराचे कच्चे पक्के शेड बांधले होते. तर काही ठिकाणी कच्च्या स्वरूपाचे दुकाने काढण्यात आली होती. ही सर्व अतिक्रमणे वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने नेहमीच या भागात लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज दुपारी तीन वाजेपासून कारवाई करत एकूण 30 अतिक्रमण जमिनदोस्त केली.
तोंडी सूचना देऊन देखील अतिक्रमणधारक जुमानत नव्हते
दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन मीटरच्या फुटपाथवर देखील अतिक्रमण करण्यात आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांना वेळोवेळी तोंडी सूचना देण्यात आल्या होता. परंतु तोंडी सूचना देऊन देखील अतिक्रमणधारक जुमानत नसल्याने आज जेसीबीच्या साह्याने ही सर्व अतिक्रमने काढण्यात आली. विशेष म्हणजे बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असल्याने नुकताच सिमेंट काँक्रेटच्या रस्ता करण्यात आलेला आहे. पण यावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता छोटा होत होता.
यापूर्वीच केली होती पाहणी...
बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा रस्त्यावर काही ठिकाणी गट्टू बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी एक महिन्यापूर्वी या ठिकाणी पाहणी केली होती. त्याचवेळी सर्व अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दिले होते. मागील 15 दिवसांपासून या भागात मोहीम राबवून इतर सर्व अतिक्रमणे काढण्यात आली होती. तर आज बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आली आहे. तसेच पुढील आढवड्यात लाल मस्जिद टाऊन हॉल परिसर ते मकाई गेट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत असे अतिक्रमण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad: औरंगाबाद महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई; तब्बल 10 हजार मीटर केबल 'कट'