Aurangabad News: पथदिव्यांवरील अनधिकृत केबलविरुद्ध औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) पुन्हा एकदा धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. सोमवारी मनपाच्या पथकाने तीन वेगवेगळ्या झोनमध्ये कारवाई करून दिवसभरात तब्बल 10 हजार 170 मीटर केबल काढून जप्त केले आहे. विशेष म्हणजे ही मोहीम 30 जानेवारीपर्यंत चालणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


मनपा प्रशासनाने शहरात 28 नोव्हेंबरपासून चार ते पाच दिवस विशेष मोहिम राबवून विद्युत खांबांवरील केबल्स हटविल्या होत्या. या कारवाईत सुमारे 20 किलोमीटरहून अधिक केबल जप्त करण्यात आले होते. परंतु त्यानंतर ही कारवाई पुन्हा थांबली होती. दरम्यान आता जी-20 परिषदेच्या निमित्ताने महापालिकेकडून शहरभर सुशोभीकरणाची कामे केली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत केवलविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग व वॉर्ड अधिकारी यांच्या पथकामार्फत सोमवारी शहरातील झोन क्रमांक 1, 4 आणि 7 मध्ये ही मोहीम राबवून 10 हजार 170 मीटर अनधिकृत केबल्स काढून जप्त करण्यात आले.


न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन जागे झाले


पथदिव्यांवरील अनधिकृत केबल शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यामुळे अनेकदा अपघात होत असतात. त्यामुळे याची दखल घेत, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला विजेच्या खांबांवरील अनधिकृत केबल काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतरही महापालिकेने अनधिकृत केबलवर कारवाई न केल्यामुळे खंडपीठाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना 25 हजार रुपयांची कॉस्ट लावली. यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. 


'या' भागात कारवाई 


आतापर्यंत महापालिकेच्यावतीने मुकुंदवाडी, पायलट बाबानगरी ते प्रकाशनगर, प्रकाशनग- ते रामनगर कमान, रामनगर ते विठ्ठलनगर, कामगार कॉलनी ते केम्ब्रिज शाळेपर्यंत, हॉटेल अमरप्रीत चौक ते क्रांती चौक, क्रांती चौक ते अजबनगर कमान, क्रांती चौक ते सतीश पेट्रोलपंप, अहिल्याबाई होळकर चौक ते हॉटेल पंचवटी, पंचवटी ते रेल्वे स्टेशन, मदनी चौक गंजे शाईदा कब्रस्तान, खास गेट ते जिन्सी पोलिस स्टेशन, रेंगटीपुरा ते चंपा चौक, चंपा चौक ते शहा बाजार कमानीपर्यंत, शहा बाजार ते चेलीपुरा पोलिस चौकी, श्रीराम मंदिर रोड ते किराडपुर चौक, सेंट्रल नाका ते एमजीएम गेट क्रमांक 6 आदी भागांत विद्युत खांबांवरील केबल्स काढल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: औरंगाबादच्या चंपा चौकातील राजकीय कार्यालयांसह तब्बल 80 अतिक्रमण जमीनदोस्त; महानगरपालिकेची कारवाई