Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) शिवाजीनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, पती नोकरीवर जाताच एका विवाहित महिलेने बेडरूममध्ये स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि त्यानंतर टोकाचे पाऊल उचलत आपला जीव दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रुपाली मयूर गायकवाड (वय 20 वर्ष, रा. आनंदनगर गल्ली क्र. 04, शिवाजीनगर) असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे. 


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली गायकवाड यांनी आपले पती मयूर गायकवाड यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जेवण केले. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होते. तर त्यावेळी रुपाली गायकवाड आनंदी होत्या अशी माहिती मयूर गायकवाड यांनी दिली आहे. जेवण झाल्याने मयूर नेहमीप्रमाणे नोकरीवर निघून गेले होते. तसेच सासू-सासरे सुद्धा दुकानावर गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसताना रुपाली यांनी आधी आपल्या दोन वर्षांच्या मुलीला वरच्या मजल्यावरील खोलीत नेऊन टीव्हीवर कार्टून लावून दिले. मुलगी कार्टून पाहत असतानाच खालच्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये येऊन स्कार्फने गळफास घेतला. 


मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली 


दरम्यान वरच्या मजल्यावर कार्टून पाहणाऱ्या मुलीला बऱ्याच वेळेपासून आई दिसत नसल्याने ती खालच्या मजल्यावरील बेडरूममध्ये आली. यावेळी तिला आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने ती आईजवळ रडत बसली. तर रुपालीच्या घरातून बऱ्याचवेळेपासून मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात जाऊन पहिले असता, त्यांना रुपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले. रूपालीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून शेजारचे घाबरले आणि त्यांनी याची माहिती गायकवाड कुटुंबीयांना दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रूपालीचा मृतदेह फासावरून खाली उतरवत शासकीय घाटी रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासून रुपालीला मृत घोषित केले. तर या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


आत्महत्येचं कारण अस्पष्ट!  


मयूर जेव्हा जेवण करून घरून नोकरीसाठी गेला तेव्हा रुपाली आनंदी होती. त्यामुळे घरात कुठलाही वाद नसताना रुपालीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकला नाही. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad: धक्कादायक! सीआयडी कर्मचाऱ्यांने रेल्वे समोर उडी घेऊन केली आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु