औरंगाबाद : औरंगाबादमधील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

येत्या 13 तारखेला इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांची भेट घेणार आहेत. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू धर्मीयांचं मोठं शक्तीस्थान मानलं जातं. दुसरीकडे, इम्तियाज जलील हे कट्टरतवादी एमआयएम या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत.

इम्तियाज जलील यांच्या भेटीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. इम्तियाज जलील हे शांतीगिरी महाराजांची फक्त भेट घेणार, की आशीर्वाद घेणार हाही प्रश्न विचारला जात आहे.

लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे मी सर्वांची भेट घेत आहे. विकास करायचा असेल, तर जातीपाती बाजूला ठेवायला हव्यात, अशी प्रतिक्रिया जलील यांनी व्यक्त केली होती.

VIDEO | अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष भाजपला विकला : इम्तियाज जलील | औरंगाबाद 



हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिलेल्या शांतीगिरी महाराजांना जवळपास दीड लाख मतं मिळाली होती, आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यातच इम्तियाज जलील यांच्या नियोजित भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

औरंगाबादमधून शिवसेना-भाजप महायुतीतर्फे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आलं आहे. एमआयएम राज्यात लोकसभेची एकमेव जागा लढवणार असून ती औरंगाबादची जागा आहे.