औरंगाबाद : भाजप आणि काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांचं काय सुरु आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण गेल्या आठ दिवसात सत्तार आणि मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री दोन वेळा भेट झाली.


गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहे. कोणी नाराज असल्याची बातमी माध्यमात धडकली, की भाजपची एक टीम त्या आमदार-खासदाराच्या संपर्कात राहते आणि थेट 'वर्षा'वरुन भेटीचं निमंत्रण येतं. त्यानंतर भाजपप्रवेशाच्या ऑफर दिल्या जातात. नाराज नेत्यांची मनं भाजपच्या वाटेवर वळवली जातात.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनाही भाजपप्रवेशाच्या ऑफर 'वर्षा'वरुन मिळत आहेत. त्यांच्यासाठी औरंगाबाद स्पेशल विमान पाठवलं जात आहे. ऑफरनंतर सत्तारांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सत्तारांनी भाजपप्रवेशाची ऑफर नाकारल्याचंही म्हटलं जातं.

सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली. मात्र या जागेसाठी आधीच कुणालातरी आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहतील. भाजपने त्यांना पाठिंबा द्यावा, असं सत्तार यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे 'माझा'च्या माहितीनुसार सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत भरलेला अपक्ष अर्जही ते मागे घेतील, मात्र विधानसभेसाठी त्यांचं सेटिंग सुरु आहे.

औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बंड पुकारलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभं राहणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसने पत्ता कट केल्यानंतर सत्तारांनी काँग्रेस कार्यालयातील स्वत:च्या मालकीच्या खुर्च्याही उचलून नेल्या होत्या. आता सत्तारांची पुढची दिशा काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
संबंधित बातम्या

अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?

औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या

औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार