Aurangabad Landslide : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. 


कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. 


दरम्यान, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


मध्य महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती? 


मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्रातसर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिकसाठी मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताआहे. 


मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज? 


मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता