औरंगाबाद : एकीकडे नवी मुंबईत भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असताना दुसरीकडे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्याचबरोबर माजी महापौर गजानन बारवालही हाती शिवबंधन बांधणार आहेत. तनवाणी यांच्यासोबत 8 ते 10 नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या औरंगाबादेत रंगली आहे.


राज्यात महाराष्ट्र विकासआघाडी सरकार आल्यानंतर स्थानिक राजकारणातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामपंचायत, महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक यासारख्या स्थानिक पातळीवर पक्षांतर होत आहे. त्यात आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

किशनचंद तनवाणी आणि गजानन बरवाल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' इथे भेट घेणार आहेत. या भेटीत तनवाणी शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान किशनचंद तनवाणी यांची ही घरवापसी असेल. तनवाणी हे मूळचे शिवसेनेचेच आहेत. शिवाय ते शिवसेनेचे आमदारही होते. मात्र काही कारणांनी त्यांनी शिवसेनेला रामराम केला होता.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीने निवडणुकीला सामोरी जाण्याच्या तयारीत आहे. तर मनसे आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे.

औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 29
भाजप - 22
एमआयएम - 25
कॉंग्रेस  - 10
राष्ट्रवादी - 03
बसप - 05
रिपब्लिकन पक्ष - 01
अपक्ष - 18