औरंगाबाद : शनिवारी रात्री औरंगाबाद शहरातील वाळूज साऊथ सिटी भागात एक मुलगा कोविड पॉझिटिव्ह निघाला. पण मुलगा गतिमंद आणि अपंगही. घरातील इतर 3 सदस्य पूर्वीच पॉझिटिव्ह आलेले.त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होत. त्यामुळे त्याचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली. दुर्दैवाने त्या मुलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या समोर प्रश्न होता आता पुढे काय? एरवी रुग्ण ॲम्बुलन्स आणि बसमध्ये बसून रुग्णालयात उपचारासाठी जातात. मात्र याला धड उभेही राहता येत नव्हतं. कोरोनाच्या आजारामुळे आपल्याला काय त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय की अन्य काही, हे सांगताही येत नव्हतं. घरात एकटाच, त्याला रुग्णालयात न्यायचे कसे, कारण तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे मदत करायला आजूबाजूचे लोकही तयार नव्हते.

त्यात याला रुग्णालयात कसं दाखल करायचा हा प्रश्न डॉक्‍टरांसमोर होता. मग काय डॉक्टरातील देव माणूस जागा झाला. दौलताबाद रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ .एस. पी .बाम्हणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.पी.दाते यांनी स्वतः त्याला मदत करायचे ठरवले. पीपीई किट घातली आणि त्या मुलाला उचलून बसमध्ये घेतले. त्याला त्याचे नातेवाईक जिथे उपचार घेतात, त्याच ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं होतं. कारण त्याच्यावर केवळ उपचाराची नाही, तर देखभालीची ही गरज होती.शेवटी रात्री उशिरा शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी या दोन डॉक्टरांनी त्याला दाखल केले.

वैद्यकीय डॉ.पी.पी.दाते म्हणाले की, गेल्या 3 महिन्यापासून रात्रंदिवस काम करत आहोत. पण रात्रीचा प्रसंग आव्हानात्मक होता. त्या मुलाला काहीही करून उपचारासाठी दाखल करणं गरजेचं होतं. कारण त्याला त्याच्या वेदनाही सांगता येत नसतील. त्यामुळे काही लोकांना मदत मागितली, पण मदतीला कोणी तयार नव्हते. मग अंतर्मनातुन हाक आली आणि निर्णय घेतला की आता आपणच मदत करायची. मग डॉ.बाम्हणे यांनीही होकार दिला. पीपीई किट घातलं आणि केवळ आपलं कर्तव्य निभावले.

गेल्या 3 महिन्यापासून डॉक्टर ,नर्स कोरोनाचे संकट हद्द पार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कर्तव्यावर असताना त्यांच्यावर कुठे हल्लेही झाले. पण त्याच सेवेचं व्रत अविरत सुरू आहे. ही घटना जरी अत्यंत वेदनादायी आली, तरी अत्यंत प्रेरणादायी देखील आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे. आणि अशा घटनांमधूनच डॉक्टर नर्स यांना कोरोना विरुद्धच्या लढाईत लढण्यासाठी बळ मिळत असावे. या दोनही डॉक्टरांचं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या योद्ध्यांनी केलेल्या कार्याला एबीपीमाझाचा सलाम...