Aurangabad News: 2012 साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या चित्तेगाव येथील एका डॉक्टर पती-पत्नीकडून विवाहित महिलेचा गर्भपात करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाने डॉक्टरांच्या रुग्णालयावर छापेमारी सुरू केली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एक स्त्री रुग्णालयात आरोग्य विभागाने छापेमारी केली आहे. औरंगाबाद स्त्री रुग्णालय म्हणून असलेल्या या रुग्णालयातील डॉक्टर पती-पत्नीने एका विवाहित महिलेचा गर्भपात केला होता. धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर औरंगाबाद शहरातील एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


प्रकार असा आला समोर! 


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेने गर्भपात केल्यानंतर तिला त्रास होत होता. त्यामुळे ती दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने संबंधित डॉक्टराने तिला शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान महिला शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर याची माहिती तात्काळ आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना देण्यात आली. त्यामुळे आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयावर छापा मारला. मात्र कारवाईची कुणकुण लागताच डॉक्टर पती-पत्नी फरार झाले आहेत.


गर्भपाताचे साहित्य सापडले!


चितेगाव येथील पांगरा रोडवरील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीवर आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी पथकाला रुग्णालयात गर्भपात करणारे साहित्य आढळून आले आहे. सोबतच सरकारने बंदी घातलेले अनेक औषध देखील रुग्णालयात सापडले आहेत. तर तब्बल दोन तासांपासून पोलिस आणि आरोग्य विभागाकडून रुग्णालयात तपासणी  सुरू आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


परळीतील मुंडे गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती!


परळी येथील डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांचे गर्भपात प्रकरण 2012 मध्ये राज्यभरात गाजले होते. ज्यात विजयमाला पाटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंडे दांपत्याच्या रुग्णालयात सुरू असलेला अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता. पुढे या प्रकरणी न्यायालयाने मुंडे डॉक्टर पती-पत्नी यांना 10 वर्ष सक्तमजुरीची मजुरीची शिक्षा सुनावली होती. आता औरंगाबादमध्ये देखील याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. करण जाधव नावाच्या डॉक्टर दांपत्यांनी एका महिलेचा गर्भपात केला आहे. या घटनेनंतर दोन्ही डॉक्टर पती-पत्नी फरार झाले आहे. तर गर्भपात करण्यात आलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.


ही बातमी देखील वाचा


'नाना पटोले मविआमधील एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम उघडपणे करताहेत', राष्ट्रवादीच्या नेत्याची थेट टीका