Aurangabad Crime News: बनावट लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या कुटुंबाला लुटणाच्या टोळीचा औरंगाबाद ग्रामीणच्या पैठण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, लुटेरी दुल्हनसह तिच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे एका तरुणाची होणारी मोठी फसवणूक टळली असून, त्याचे दीड लाख रुपये देखील वाचले आहे. आंबादास नवनाथ नागरे (रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर, ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण), राजु अंकुश चाबुकस्वार (वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना) उमेश गणेश गिरी (वय 22 वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना) शिला मनोहर बनकर (वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद) असे आरोपींचे नावं आहेत.
पैठण परीसरात बनावट लग्नाच्या घटना वाढल्या असल्याने पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत सुचना करत या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पैठण पोलिसांकडून या टोळीचा शोध घेतला जात होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास नाथ मंदिर पार्किंग परीसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत वधु व वराच्या वेषात असलेल्या व्यक्तींची विचारपुस केली. मात्र यावेळी वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांमुळे पैठण पोलीसांचा सदर लग्नाबाबत संशय वाढल्याने वधु पक्ष व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
मुलाकडच्या लोकांना अशाप्रकारे फसवलं
दोन्ही पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी सखोल चौकशी केली. यावेळी प्रकाश गणेश मोरे (वय 24 वर्षे रा. टाकेशिवणी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा) या युवकाचे लग्न जुळत नव्हते. दरम्यान आंबादास नागरे याने प्रकाशच्या वडिलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन, तिला आई वडील नाही व एक भाऊ असल्याचं सांगितले. ती मुलगी परिस्थीने गरीब आहे. तसेच तुमच्या मुलाचे तिच्यासोबत लग्न लावुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्या मोबदल्यात दीड लाख द्यावे लागतील असे सांगितले. मुलाला मुली मिळत नसल्याने मुलाच्या वडिलांनी देखील नागरेला होकार दिला. त्यानुसार नागरे याने मुलाकडच्या कुटुंबातील सदस्यांना मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन लग्नाची तयारी करण्यासाठी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे एकुन 18 हजार 758 रुपयांचे खरेदी करण्यास भाग पाडले. पण याची माहिती पोलिसांना मिळाली आणि बनावट नवरीसह टोळीचा भांडाफोड झाला.
जातही खोटी सांगितली...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी हे वेगवेगळ्या जातीधर्माचे असतांना त्यांनी मुलाच्या वडीलांना वधु ही त्यांच्या जाती व धर्माची असल्याची बतावणी केली. त्यामुळे आपल्याच जातीची मुलगी असल्याने मुलाच्या वडिलांनी लग्नासाठी लगेच होकार दिला. पुढे याचा फायदा घेत नागरेसह त्याच्या साथीदारांनी स्वतःचा आर्थीक लाभ मिळवण्यासाठी बनावट लग्नाचा बनाव करुन मोरे कुटुंबाची फसवणूक केली. तसेच या टोळीने औरंगाबाद, जालना, अहमदनगर येथे तसेच परराज्यात देखील यापुर्वी याप्रकारचे बनावट लग्न केले असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यानुसार तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.