Sillod Agriculture Festival : आजपासून (1 जानेवारी) औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं (Sillod Agriculture Festival) आयोजन करण्यात आलं आहे. 40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात कला, क्रीडा आणि संस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील असणार आहे. पण हा कृषी महोत्सव सुरुवातीपासूनच वादात अडकला. कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना गोल्ड, सिल्वर पासेस विक्री करण्याचा आणि पैसा गोळा करण्याचा टार्गेट दिल्याचा आरोप विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर राहण्याची शक्यता
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गैरहजर राहण्याची शक्यता आहे. काल बीडमध्ये असलेले फडणवीस आज औरंगाबादमध्ये का गैरहजर राहणार याची चर्चा सुरु आहे. विधानसभेत राजकीय अपरिहार्यता म्हणून सत्तारांच्या पाठीशी उभे राहणारे फडणवीस अब्दुल सत्तारांच्या कृषी महोत्सवाला उपस्थित राहिले तर सत्तारांना राजकीय बळ मिळेल. वर्षानुवर्ष भाजप सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड मतदारसंघात राजकीय लढाई लढत आहे.
आमदार संजय शिरसाठ यांचीही दांडी
दुसरीकडं सत्तारांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तरीही औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी दांडी मारली आहे. शिरसाट हे आज मुंबईत असणार आहे. औरंगाबाद येथील शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित असताना शिरसाट यांनी मात्र दांडी मारली आहे. कालच पक्षांतर्गत काही लोक आपल्या विरोधात काम करत असल्याचे वक्तव्य सत्तारांनी केलं होतं. त्यानंतर संजय शिरसाठ यांची कार्यक्रमाला गैरहजेरी आहे का? अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.
कृषी महोत्सवात सामील होण्याचं शेतकऱ्यांना आवाहन
सिल्लोड नगरीत प्रथमच या कृषी महोत्सवाचे आयोजन होत आहे. यामध्ये विविध पिकाचे, फळ पिकांची तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे. तसेच विविध कंपनीचे स्टॉल्स लागणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवानी पुढील पाच दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवात सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महत्वाचा भाग म्हणजे या कृषी प्रदर्शनात चर्चासत्राचे आयोजन एक मुख्य उद्देश असल्यानं विविध पिकाविषयी शेतकरी बांधवांच्या मनात ज्या समस्या असतील त्या थेट कृषी शास्रज्ञाकडून सोडवण्याचा प्रयत्न कराव असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: