औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. प्राण्यांची पुरेशी सुविधा आणि अपुरी जागा असल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. या प्राणी संग्रहालयात 9 वाघ, 4 बिबट्यांसह हरीण, सांबर, माकड, कोल्हा, मगरी आणि इतर प्राणी आहेत. सोबतच सर्पालय देखील आहे.


केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.  केंद्राने दिलेल्या निकषांचं पालन न केल्याने हा परवाना रद्द केला आहे.  याबाबत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून अनेक वेळ स्मरणपत्र सुद्धा पाठवण्यात आली होती, मात्र महापालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. अखेर परवाना रद्द करण्याची तब्बल 47 कारणे देत परवाना रद्द केल्याचे पत्र महापालिकेत धडकले आहे.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालय महापालिकेच्या अधिपत्याखाली येते. महापालिकेचे असलेले दुर्लक्ष संग्रहालयाचा परवाना रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे.  याबाबत महापालिकेला 30 दिवसात म्हणणं मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. तो पर्यंत प्राणी संग्रहालायला टाळे ठोकण्यात येणार नाही. सिद्धार्थ उद्यान हे शहरातील एक मोठं उद्यान आहे आणि एकमेव प्राणी संग्रहालय आहे.

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली आहे, असा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे. काहीही झाले तरी औरंगाबादेतील हे प्राणी संग्रहालय बंद पडू देणार नाही, असं देखील महापौर म्हणाले आहेत.

सिद्धार्थ उद्यानाची प्राणी संपदा
वाघ- 9
बिबटे - 3
हरीण, काळवीट- 48
सांभार- 47
नील गाय- 3
चितळ- 2
सायळ-  2
कोल्हे- 2
तडस- 1
माकड- 10
वेगवेगळ्या प्रजातीचे 100 साप
विविध पक्षी 19
मगर- 5