औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी औरंगाबादेत उद्या मनसेतर्फे 'दंडुका मोर्चा' काढण्यात येणार आहे. मात्र 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर मोर्चामध्ये दंडुका अथवा त्याप्रकारचे कोणतेही इतर शस्त्र बाळगण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.


शेतकऱ्यांनी मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये. तसेच दिलेल्या परवानग्यांमधील अटींचे पालन करावे आणि कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


काही दिवसांपूर्वी मनसेनं दंडुका मोर्चे काढण्याबाबत पोलिसांना पत्र दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती, मात्र शहरात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू आहे. त्यामुळे पोलिसांनी दंडुका म्हणजेच शस्त्राची लेखी परवानगी कशी दिली? असा प्रश्न 'एबीपी माझा'ने उपस्थित केला होता.


 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर पोलिसांना आपली चूक झाल्याचं लक्षात आलं. आता एकदिवस आधी पोलिसांनी मनसेला हातात दंडुके घेऊन येऊ नये, अशा प्रकारचं नोटीसही दिली आहे. ऐनवेळी पोलिसांकडून अशी नोटीस आल्यानं मनसेच्या मोर्चेकऱ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे आणि सरकारची काहीही तयारी नाही, असा आरोप मनसेने केला होता. दुष्काळाच्या स्थितीत जनावरांसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. म्हणूनच सरकारला जाग यावी यासाठी मनसेने औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चाचं आयोजन केलं आहे.