Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी 25 अधिकारी अन् 200 कर्मचारी; पोलिसांकडून खबरदारी
Aditya Thackeray Shiv Samvad Yatra: आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी 25 अधिकारी आणि 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, जास्तीचा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
Aditya Thackeray Shiv Samvad Yatra: ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. दरम्यान, औरंगाबादच्या वैजापूर येथे आदित्य ठाकरे यांच्या सभेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला मोठा बंदोबस्त देण्यात आला आहे. पैठणच्या बिडकीन येथे होणाऱ्या सभेसाठी तब्बल 25 अधिकारी आणि 200 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वैजापूरच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता पोलीस अलर्ट झाले आहे. त्यामुळे आज आदित्य ठाकरे यांच्या बिडकीन येथील कार्यक्रमासाठी तीन ते चार पोलीस ठाण्यातील विशेष बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तर सीआयडीचं विशेष पथक घटनास्थळी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणाला छावणीचे स्वरूप आलं आहे.
पोलीस शिंदे गटावर लक्ष ठेवून...
ज्या बिडकीन गावात आदित्य ठाकरे यांची सभा होत आहे. तिथे शिंदे आणि ठाकरे गट मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. विशेष म्हणजे, याच गावात आदित्य ठाकरे यांची रॅली निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली होती. त्यामुळे गटातटाचं राजकारण पाहता पोलिसांकडून खबरदारी घेतली जात. त्यामुळे आदित्य यांच्या कार्यक्रमासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला...
आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात पुन्हा कोणताही गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. यासाठी इतर तीन ते चार पोलीस स्टेशनचा विशेष बंदोबस्त मागवण्यात आला. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या स्टेजवर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे.