औरंगाबाद : तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर भारतात परतलेल्या हसीना दिलशाद अहमद यांचं आज (9 फेब्रुवारी) निधन झालं. औरंगाबादमध्ये त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा दफनविधीही आज पार पडला.
पासपोर्ट चोरीला गेलेल्या हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांची तब्बल 18 वर्षांनंतर जेलमधून सुटका झाली होती. 26 जानेवारी 2021 रोजी त्या औरंगाबादला परतल्या होत्या. परंतु आयुष्यातील 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद राहिलेल्या हसीना बेगम यांना कुटुंबीयांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचं सुखही मिळालं नाही. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी त्यांना मृत्यूने कवटाळलं.
हसीना बेगम पाकिस्तानच्या जैलमध्ये कैद कशा झाल्या?
हसीना बेगम आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. तिथे पोहोचल्यावर लाहोरमध्ये त्यांचा पासपोर्ट हरवला. मागील 18 वर्षांपासून त्या पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद होत्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली.
हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने जानेवारी महिन्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.