औरंगाबाद : 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेल्या औरंगाबादच्या हसीना बेगम भारतात परतल्या आहेत. 65 वर्षीय हसीना बेगम 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. परंतु पासपोर्ट हरवल्याने त्यांना भारतात परतता आलं नाही. त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) त्या भारतात परतल्या.
मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. "मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतंय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आलं आहे. या प्रकरणात अहवाल सादर करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतात परतल्यावर दिली.
हसीना बेगम यांना भारतात परत आणण्यासाठी मदत करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचे बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी आभार मानले.
हसीना बेगम आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. तिथे पोहोचल्यावर लाहोरमध्ये त्यांचा पासपोर्ट हरवला. मागील 18 वर्षांपासून त्या पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद होत्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक स्टेशन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसीना बेगम यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली.
हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.