औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक नाभिक समाज चिंतेत आहे. कारण पूर्वीच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील 55 ते 60 तर औरंगाबादेत 70 टक्के सलून बंद झाली आहेत. काही महिलांनी ब्युटी पार्लर आपल्या घरी सुरु केली आहेत. काहींनी पार्लर बंद केले. तर मोठ्या युनिसेक्स सलूनने आपले आउटलेट बंद केले. तर काहींनी तर जोडधंदा म्हणून वेटलॉसचा व्यवसाय सुरु केला.


ज्या व्यक्तीच्या हातात कला आहे ती व्यक्ती उपाशी राहत नाही, असं म्हटलं जातं. मात्र कोरोनाच्या विषाणूमुळे हातात केस कर्तनाची कला असणाऱ्या नाभिक समाजाच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे 24 मार्च पासून राज्यातील सलून आणि पार्लर बंद झाली. काही महिन्यांपूर्वी ती सुरु झाली पण सहा सात महिने बंद असलेली दुकाने आणि त्यांच्या ठरलेल्या भाड्यामुळे अनेकांना सुरुवातीलाच सलून बंद करावे लागले. काहींनी महिना-दोन महिने चालवून पाहिलं, मात्र कोरोनाच्या भीतीने ग्राहक काही यायला तयार नव्हते. आज मितीला राज्यातील 60 टक्के सलून बंद झाल्याची माहिती नाभिक समाजातील सलून व्यवसायाचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी दिली. त्यामुळे राज्यातील अनेक सलून व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचं दळे सांगतात.


या कारागिरांपैकी 98 टक्के कुटुंबाकडे शेती नाही अणि कुटुंब जगवण्यासाठी दुसरे कुठलेही उदरनिर्वाहाचे साधन नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या आरोग्य खर्च अशा अनेक अडचणी, त्यात घर कसे चालवायचे हे प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. अशा नैराश्येच्या वातावरणामध्ये आत्महत्येचं पाऊल नाभिक समाजातील व्यवसायिक उचलत असल्याचेही दळे यांनी सांगितले.


राज्याच्या नाभिक समाजाच्या अध्यक्षांनी नाभिक समाजाची कोरोनामुळे झालेली अवस्था सांगितल्यानंतर आणि औरंगाबाद येथील व्यावसायिकांनी भेटण्याचे ठरवले. त्यानंतर आमच्याही लक्षात आलं औरंगाबादेतही 70 टक्के सलून बंद झाले आहेत तर काही शेवटची घटका मोजत आहेत.


हर्षा संजय सलून औरंगाबाद इथल्या युनिसेक्स सलूनमधलं मोठं सलून. मात्र यात दुकानावर सध्या सलूनच्या बोर्डासोबत वेटलॉसचा बोर्ड लागला आहे. दीड वर्षांपूर्वी याच हर्षा संजय सलूनमध्ये आम्ही बातमी केली होती. या सलूनमध्ये एमबीबीएस, एमबीए आणि इंजिनीअर झालेल्या तरुणी प्रशिक्षण घेतात. मात्र कोरोनामुळे संजय इंगळे यांनी सलूनसोबतच वेटलॉसचा नवीन व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांपैकी 25 कामगारांना सुट्टी दिली. वेटलॉसचा व्यवसाय सुरु केला नसता तर आहे त्या कामगारांनाही पगार देऊ शकलो नसतो असं संजय इंगळे सांगतात.



त्यानंतर आम्ही वाळूज भागातील अनिता साळवी यांची भेट घेतली. त्यांची व्यथा ही डोळ्यात पाणी आणणारी आहे. "माझं ब्युटी पार्लर हे भाडेतत्त्वावर होतं. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. संपूर्ण घर माझ्यावर चालतं. दोन बहिणी आहेत, दोन मुलं यांचा संभाळ मी एकटी करते. घरही भाड्यावर घेतलं आहे. दोन्ही भाडे मी भरु शकत नव्हते. त्यामुळे मला ब्युटीपार्लर बंद करावं लागलं. आता घरात सुरु केलंय, पण तिथेही महिला येत नाहीत. त्यांना भीती वाटते. यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. किती दिवस घरात राहून भाडे भरु. मुलांचं शिक्षण, बहिणींचा खर्च हे सगळे बघावे लागते, आता पुढे काय होईल सांगता येत नाही पण आता दुकान मात्र बंद केलं, असं अनिता साळवी सांगतात.



अश्विनी परदेशी आपलं स्वतःचं घरच पार्लर सोडून त्यांनी दुसऱ्या पार्लरमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. परदेशी म्हणतात की, "कोरोना आमच्या व्यवसायाच्या जीवावर आला. महिलांच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यात माझ्या घरात माझे आई-वडील आहेत, त्यांचं वय 60 वर्षे आहे. मे पूर्वी घरामध्ये पार्लर चालू होतं. पण आता बंद केलं. सगळं सामान पॅक करुन ठेवलं, पण आता त्यावर धूळ साचली आहे. आता पुन्हा पार्लर सुरु करायची हिंमत नाही कारण ग्राहक मिळेलच याचा विश्वास नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की काही दिवस शांत राहायचं. आता मी दुसऱ्याच्या पार्लरमध्ये जाऊन जॉब करते, सामान विकण्याचा प्रयत्न करते पण तेही विकलं जात नाही.



तुकाराम पारे यांनी शहरातील चिस्तिया चौकातलं आपलं बालाजी सलून बंद करुन तिथे नाश्त्याचं हॉटेल सुरु केले आहे. त्यांच्या सलूनमध्ये चार कामगार होते. 1994 पासून वडिलोपार्जित सलूनचा व्यवसाय मी बंद केला आहे. पर्याय नाही म्हणून तिथे हॉटेल व्यवसाय सुरु केला. मी एकटाच नाही तर औरंगाबाद येथील अनेक संचालकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. बहुतेकांचे सलून हे रेंटवर आहेत, घरही रेंटवर आहेत, त्यामुळे भाडे भरणे मुश्किल झालं आहे, असं तुकाराम पारे यांनी सांगितलं.



नाभिक समाजाचा सलून व्यवयाय हा फेस टू फेस आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात लोक आजही सलूनमध्ये जायला फारसे धजावत नाहीत. राज्यात सलून व्यवसायावर 19 लाख 78 हजार कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. लॉकडॉनमुळे सलून व्यवसाय बंद झाल्याने 27 कामगारांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. आजपर्यंत राज्यात 65 ते 70 टक्के सलूनला टाळ लागलं आहे. तर काही शेवटच्या घटका मोजत आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन की चर्चा सुरु झाली आहे. त्यातच लॉकडाऊन झालं तर सर्वाधिक फटका सलून व्यवसायाला बसणार आहे आणि हे परवडणारं नाही हे नक्की.