औरंगाबाद : औरंगाबाद एकीकडे सदाभाऊ खोत यांची बंडखोरी रोखण्यात यश आलं असलं तरी दुसरीकडे मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरत आहे. माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांनी भाजपाचा अधिकृत उमेदवार जाहीर होऊनही उमेदवारी अर्ज दाखल केले. आज भाजप नेते जयसिंग गायकवाड भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत येणार हे मात्र निश्चित.


मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपला प्रवीण घुगे यांची बंडखोरी शमवण्यात यश मिळालं. अद्यापही रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांनी पक्षाकडे दुसरा उमेदवार म्हणून आपल्याला घोषित करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे पोकळे यांची बंडखोरी शमवण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार भागवत कराड हे आज दुपारी औरंगाबादमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते हे जयसिंग गायकवाड यांना पदवीधरची उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. "मी भाजपच्या प्रदेश कार्यसमती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकृत करावा," असे गायकवाड यांनी पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.



जयसिंगराव गायकवाड यांनी गट निवडणुकीमध्ये देखील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पदवीधर निवडणुकीमध्ये देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र पक्षाकडून शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी घोषित केल्यानंतर गायकवाड नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. त्यामुळेच आज त्यांनी आपला राजीनामा दिल्याची देखील माहिती मिळत आहे.


याविषयी जयसिंगराव गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, "मी पक्षाकडे पक्षबांधणीसाठी पदाची मागणी केली होती ती मात्र भाजपाकडून ती पूर्ण न झाल्यामुळे आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे..


जयसिंग गायकवाड 21 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
जयसिंग गायकवाड यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केलं आहे. संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी मराठवड्यात मोठं काम केलं आहे. भाजपने त्यांना बीड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती, त्यात ते विजयी झाले. त्यानंतरची निवडणूक ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढले आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आता पदवीधर निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने जयसिंग गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या 21 तारखेला जयसिंगराव गायकवाड यांना मुंबई भेटीचे आमंत्रण दिले आहे आणि तेथे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतील अशी देखील माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर एकनाथ खडसे आणि जयसिंग गायकवाड हे मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्याचा दौरा करुन भाजपविरोधी मोहीम राबवतील अशी देखील माहिती मिळत आहे.