जालना : मन सुन्न करणारी धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग केला. चीड आणणारी गोष्ट म्हणजे या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला. यानंतर एबीपी माझाने हा व्हिडीओ जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे सोपवला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मिळेपर्यंत पोलिसांनाही या घटनेची कल्पना नव्हती.


दरम्यान हा व्हिडीओ मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीचा आहे. मात्र हा व्हिडीओ अर्धवट आहे. या व्हिडीओमध्ये हे टोळकं तरुणीला कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहे. ही तरुणी सध्या कुठे आहे, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


या गावगुंडांनी युगुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलीची कॉलर पकडून तिला फरफटत घेऊन जात आहेत. "आम्ही चुकीचं काही केलं नाही. इथे तळं होतं म्हणून आलो. दादा प्लीज, यानंतर नाही होणार, अशा शब्दात संबंधित तरुण टोळक्यासमोर तरुणीला सोडण्याची विनवणी, गयावया करत आहे. मात्र तरीही या गावगुंडांना त्यांची दया आली. त्यांनी मुलीला तसंच पकडून ठेवलं. "हिच्या वडिलांना फोन लाव, बापाला बोलावून घे," असं हे गावगुंड तरुणाला बोलताना दिसत आहे.


मुख्यमंत्र्यांकडून दखल
एबीपी माझाच्या या बातमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या संसदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. तर दुसरीकडे जालना पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची स्थापना केली आहे.


छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करावी : विद्या चव्हाण
"आम्ही निश्चित या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊ आणि असे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करु. अशा छेडछाड करणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे," असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या.


भाषण नको, कारवाई हवी : चित्रा वाघ
पोलिसांना एबीपी माझ्याच्या माध्यमातून ही बातमी समजत असेल तर पोलीस काय करत आहेत. पोलीस अधीक्षक जर अनभिज्ञ असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. राज्य सरकारवर यावर काय भूमिका घेत आहे हे आम्हाला कळायला हवं. आम्हाला फक्त भाषणं नको तर कारवाई हवी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.


मला लाज वाटतेय : अर्जुन खोतकर
"या घटनेचा मी तीव्र निषेध करत आहे. मी स्वत: त्या जिल्ह्यातील असल्यामुळे या घटनेचा मला धक्का बसलाच, पण लाजही वाटत आहे," अशा शब्दात शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.


आरोपींवर तातडीने कारवाईचे आदेश : शंभूराजे देसाई
"ही बाब अतिशय गंभीर आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शोधून तात्काळ अटकेचे आदेश पोलिसांना आदेश देत आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्फत याची चौकशी केली जाईल. या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपण आढळला तर कारवाई केली जाईल," असं आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी दिलं.