अहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

अंजली यांनी दुसर्‍यांदा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भट्टेवाडीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतात सुरु असलेला संवाद.... पिकांची पाहणी... शेतकऱ्यांशी चर्चा... परस बागेची माहिती आणि पशुधनाची काळजी... हे सारं पाहिल्यावर आपल्याला कदाचित कृषी खात्याचा दौरा वाटेल. मात्र अंजली तेंडुलकर यांची सेंद्रिय शेतीला दिलेली ही भेट आहे. पाच ते सहा तास थांबून त्यांनी पिकांची माहिती घेतली.



काय करायचं हे समजून घ्यायला आपण आलो असल्याचं अंजली तेंडुलकर यांनी सांगितलं. सेंद्रिय शेतीची कामं करणाऱ्या इच्छुकांनी नावं दिल्यास आपण नियोजनपूर्वक काम करु आणि असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासनही दिलं आहे.

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी पुढाकार

अंजली तेंडुलकर यांच्या स्नेही क्लिया चांदमल या भट्टेवाडीला सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. क्लिया यांच्या मार्गदर्शनात काही शेतकऱ्यांनी इथे सेंद्रिय शेतीला सुरुवात केली आहे. निसर्गाला पूरक शेती करण्याचं आवाहन त्या करतात. खतासाठी शेतातील पालापाचोळा आणि फवारणीसाठी जंगल ज्यूसचा वापर करण्याचं आवाहन क्लिया यांनी केलं आहे.

अंजली तेंडुलकर यांनी दोन ते तीन शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या अंजली यांना शेतीचं आणि माणसाचं आरोग्यही माहित आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती पाहण्यासाठी अंजली इथे आल्याचं क्लिया यांनी सांगितलं.



शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढते कॅन्सर याचं कारण अन्नात असल्याचं अंजलीला माहित आहे. त्यामुळेच त्या हा प्रयोग पाहण्यासाठी भट्टेवाडीला आल्या आहेत, असं क्लिया यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचाही सेंद्रिय शेतीला प्रतिसाद

क्लिया चांदमल यांच्या मार्गदर्शनात भट्टेवाडीच्या दोन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरु केली. तर काहींनी घराजवळच परस बाग केली आहे. त्यामुळे घरच्या घरी दर्जेदार वेगवेगळ्या पालेभाज्या मिळू लागल्या आहेत. सुरेश क्षेत्रे या शेतकर्‍याने पाऊण एकरात फळबाग आणि परसबाग केली आहे. यामुळे फ्रीज सारखा ताजा भाजीपाला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महादेव गाडेकर यांनीही एक एकरात सेंद्रिय शेती सुरु केली आहे.



अंजली तेंडुलकर आणि क्लिया चांदमल यांनी भट्टेवाडीला ग्लॅमर मिळवून दिलं आहे. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार तर केला आहे. त्याचबरोबर गावाला आर्थिक मदतही केली आहे. भारतरत्न आणि खासदार सचिन तेंडुलकर यांच्या खासदार निधीतून कम्युनिटी हॉलसाठी 20 लाख मंजूर केले आहेत. त्यामुळे भट्टेवाडी या गावाशी तेंडुलकर दाम्पत्याचे दुहेरी ऋणानुबंध जोडले आहेत.

आता हक्काच्या मार्केटची गरज

भट्टेवाडीत सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. कमी खर्च आणि दर्जेदार अन्न मिळू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढू लागला आहे. मात्र उत्पादीत शेतमालाला हक्काचं मार्केट गरजेचं आहे. अंजली तेंडुलकर यांच्या माध्यमातून सेलिब्रिटींचं मार्केट मिळाल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

संबंधित बातमी :

नगरच्या शेतात अंजली तेंडुलकरांचा फेरफटका, शेतकऱ्याच्या घरी जेवण