जोहान्सबर्ग, द. आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स स्टेडियमवर सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियानं लाजिरवाणी हार स्वीकारली आहे. त्यामुळे जोहान्सबर्गच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश टाळून 'नंबर वन'ची प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.


केपटाऊन कसोटी... दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर 72 धावांनी मात.

सेन्च्युरियन कसोटी... दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा 135 धावांनी धुव्वा.

आणि जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या नंबर वन टीम इंडियासमोर आव्हान आहे ते व्हाईटवॉश टाळण्याचं.

खरं तर विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली होती, ती एका ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचं स्वप्न उराशी बाळगून. गेल्या पंचवीस वर्षात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती.

सलग नऊ कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या दृष्टीने आजवरचा सर्वात सक्षम संघ मानला जात होता.

भारतीय गोलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेच्या वीस-वीस विकेट्स काढून आपली कामगिरी चोख बजावलीही. पण भारतीय फलंदाजांनी केपटाऊन आणि सेन्च्युरियनच्या मैदानात पुन्हा पुन: लोटांगण घातलं आणि टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी मालिकाविजयाचं स्वप्न धुळीला मिळालं.

आता तर विराटसेनेसमोर आव्हान आहे ते व्हाईटवॉश टाळून 'नंबर वन'ची प्रतिष्ठा राखण्याचं. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आणि फॅफ ड्यू प्लेसीचा दक्षिण आफ्रिकी फौज जोहान्सबर्गच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत.



भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांत जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स स्टेडियमवर आजवर चार कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कसोटी सामने अनिर्णीत राहिले असून, एका कसोटी सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या आगामी कसोटीसाठी वॉण्डरर्सच्या खेळपट्टीवर गवत राखण्याची यजमान दक्षिण आफ्रिकेची रणनीती आहे. भारतीय फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळताना उडणारी दाणादाण पाहता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीची जोहान्सबर्ग कसोटीसाठीची रणनीती स्वाभाविक आहे.

भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, मालिकाही गमावली


भारताच्या एकाही फलंदाजांना पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी बजावता आलेली नाही. आधी मुरली विजय आणि शिखर धवन, मग मुरली विजय आणि लोकेश राहुलला भारतीय डावाचा भक्कम पाया रचता आला नाही.

चेतेश्वर पुजारानं 2013 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सर्वाधिक धावांचा रतीब घातला होता. एक भरवशाचा फलंदाज म्हणून त्याचा लौकिकही मोठा आहे. पण या दौऱ्यात पुजारानं आपल्या लौकिकावर बोळा फिरवला आहे. कर्णधार विराट कोहलीनं सेन्च्युरियनवर एक शतक ठोकलं, पण त्याचाही एकंदर परफॉर्मन्स लौकिकाला साजेसा नाही.

रोहित शर्मालाही वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीतला आपला फॉर्म दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्यांमध्ये दाखवता आलेला नाही. हार्दिक पंड्यानं केपटाऊनवर एकदा दांडपट्टा चालवला, पण त्याची कपिलदेवशी होणारी तुलना म्हणजे काजव्याची सूर्याशी होणारी तुलना असल्याचं लवकरच स्पष्ट झालं.

भारतीय फलंदाजीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेली वाताहत पाहता, टीम इंडियाला आता आपले पत्ते पुन्हा पिसून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

या परिस्थितीत भारतीय संघात काय बदल होऊ शकतात?

अजिंक्य रहाणेला त्याची उपयुक्तता पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

चेतेश्वर पुजाराऐवजी स्ट्राईक बदलता ठेवू शकणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येणं अपेक्षित आहे.

केपटाऊन कसोटीतला भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात स्थान मिळण्याची गरज आहे.

वॉण्डरर्सच्या खेळपट्टीचा बाऊन्स लक्षात घेऊन स्लीपच्या क्षेत्ररचनेतही बदल अपेक्षित आहे.

अर्थात भारतीय संघात आवश्यक ते सारे बदल घडून आले, म्हणजे जोहान्सबर्गच्या कसोटीत विराटसेनेच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होण्याची हमी देता येणार नाही. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नंबर वनची प्रतिष्ठा राखण्याची टीम इंडियाला मिळणारी ही अखेरची संधी आहे. ती संधी तरी विराटसेनेनं दवडू नये, एवढीच  तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या :


राहुलला दुखापत, तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी?


तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?


दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला व्हाईटवॉश देईल : कागिसो रबादा


दुसऱ्या डावात टीम इंडियाची घसरगुंडी, विजयासाठी २८७ धावांचं आव्हान


विराटचं शतक, पण टीम इंडिया बॅकफूटवरच


अनुष्कानं दिलेल्या अंगठीचं चुंबन घेत विराटचं सेलिब्रेशन


विराटमुळे भारताच्या पहिल्या डावाला आकार


टीम इंडियासाठी 'करो या मरो', केपटाऊनचा वचपा काढणार?


दुसऱ्या कसोटीआधी द. आफ्रिकेला मोठा धक्का


केपटाऊन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इतिहास रचला


दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला, 72 धावांनी मात