मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमरावतीमध्ये (Uddhav Thackeray Amravati Visit) दाखल झाले असून शिवसैनिकांनी (Amravati Shivsena) त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीचं राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र आहे. दुपारी शिवसैनिकांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे पोस्टर फाडल्याने संध्याकाळी राणा गटाच्या (Ravi Rana Naveet Rana) कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे पोस्टर फाडल्याची घटना घडली. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमरावतीत दाखल झाले असून बडनेरानंतर नवाथे चौक, राजापेठ चौक, राजकमल चौकात शिवसैनिकांकडून  त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे उद्या अकोला आणि अमरावती पदाधिकारी यांची बैठक घेतील आणि दुपारी 1 वाजता मेळाव्याला संबोधित करतील. 


दरम्यान, बॅनरवरून शिवसेना ठाकरे गट आणि युवा स्वाभिमान पार्टीत वाद सुरू आहे. दुपारी राणा दाम्पत्यांचे शिवसैनिकांकडून पोस्टर फाडण्यात आले, त्याला उत्तर म्हणून आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडायला सुरुवात केली. त्यानंतर रवी राणांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून आतापर्यंत सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


आमदार रवी राणा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिल्या नोटिसा


आमदार रवी राणा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, आपण युवा स्वाभीमानी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे. 9 जुलै आणि 10 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अमरावती दौरा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे कोणतेही गैरकृत्य करु नये. गैरकृत्य केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यान्व्ये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याकरीता आपणास नोटीस देण्यात येत आहे


उद्धव ठाकरे अमरावतीत येण्यापूर्वी राणा दाम्पत्यांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली. सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सामूहिक हनुमान चालिसाचं आयोजन करण्यात आल्याचं पोस्टर्स राणा दाम्पत्याकडून अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कुल चौकात लावण्यात आले.  उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरखाली हे बॅनर लावण्यात आल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार रवी राणा आणि आमदार नवनीत राणा यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोघांवरही कारवाई करण्यात आली होती आणि त्यांना 14 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. 


ही बातमी वाचा: